बहुचर्चित असणाऱ्या पिरनवाडी येथील नामफलकाविषयी थोडीशी उत्सुकता म्हणून ज्यांनी हा फलक घडविला त्यांच्यापर्यंत “बेळगाव लाईव्ह” पोहोचले. आणि बेळगावच्या ऋतुराज फॅब्रिकेटर्स संचालक आणि मूळचे पिरणवाडी येथील प्रशांत चौगुले यांची आम्हाला माहिती मिळाली.
गेले पंधरा दिवस पुतळा आणि त्यानंतर फलकावरून गाजणाऱ्या बेळगावमध्ये अनेक घटना घडल्या. ज्या फलकाने बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष वेधून घेतले त्या पिरणवाडी येथील फलकाजवळ अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. दररोज अनेक युवक फोटो काढून घेताहेत.
बेळगावमध्ये येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” हा फलक लक्षवेधी आहे. त्यानंतर आता पिरनवाडी येथे उभारण्यात आलेला भव्य नामफलक हा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. हा फलक कसा बनविण्यात आला याविषयी ऋतुराज फॅब्रिकेटर्स संचालक प्रशांत चौगुले यांच्याशी केलेली बातचीत…
हा फलक तयार करताना शिवमुद्रेला नजरेसमोर ठेऊन छत्रपतींचा आदर्श घेऊन या फलकाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांनी ज्या भगव्या झेंड्याची आबा कायम राखली तो भगवा रंग या फलकासाठी निवडला गेला. आणि त्यानंतर शिवमुद्रेच्या आकारात हा फलक साकारण्याचे ठरविले. यासाठी गावातील दोन्ही समाजातील नेत्यांशी, तरुण मंडळांची चर्चा केली. शिवाय मराठी – कन्नड हा मुद्दा वादाचा विषय ठरू नये यासाठी मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेतून या फलकावर “छत्रपती शिवाजी चौक” असे नाव नमूद करण्यात आले.
या फलकाची उंची १७ फूट आणि रुंदी ९.5 फूट इतकी असून हा फलक तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा फलक तयार करण्यासाठी पिंटू सुळेभाविकार, प्रशांत गुरव, कृष्णा बागेवाडीकर, विष्णू हलगी, कृष्णा बिंबले या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. अशी माहिती प्रशांत चौगुले यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना दिली आहे.