बेळगावच्या महांतेशनगरमध्ये मागील १५ वर्षांपासून योग्यरितीने पाणीपुरवठा करण्यात येत नाही. मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्याअभावी येथील नागरिकांची गरसोय होत आहे. येथील नागरिकांनी सातत्याने मनपा अधिकारी, पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी, संबंधित विभागाचे लोकप्रतिनिधी आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचनाही दिली आहे.
याभागात घालण्यात आलेल्या भूमिगत रिलायन्स केबल कामकाजामुळे जलवाहिन्यांचे नुकसान झाले आहे . यामुळे येथील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. उन्हाळा सुरु होण्या आधीच उद्भवलेल्या या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. आज आमदार अनिल बेनके यांनी महांतेश नगरमधील सेक्टर क्रमांक १२ येथे भेट देऊन पाहणी केली आणि याठिकाणी उद्भवलेली पाणी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
विकासकामांच्या नावाखाली येथे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून येथील जलवाहिन्या फुटल्या आहेत. याविभागात कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून जबाबदारीने समस्या सोडविल्या जात नाहीत. शिवाय वर्षानुवर्षे या भागात अनेक समस्या भेडसावत आहेत.
मूलभूत सुविधांची येथे वानवा असून अनेकवेळा यासंदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. परंतु महांतेशनगर भागात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार येथील नागरिक करत होते.
याठिकाणी भेट द्यायला आलेल्या आमदार अनिल बेनके यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. बेळगावमधील अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. रामतीर्थ नगर, हनुमान नगर, रिसालदार गल्ली येथील पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न सोडविण्यात आले आहेत.
याचप्रमाणे महांतेश नगरचाही प्रश्न सोडविला जाईल. स्मार्ट सिटीची कामे सुरु असताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते निदर्शनास आणून द्यावे, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. महांतेश नगर भागातील पाण्याची समस्या मी माझ्या जबाबदारीने सोडवेन, असे आश्वासन आमदारांनी दिले.