दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर लिंगायत समाजाच्या धार्मिक विधिनुसार दफन करण्यात आले.रेल्वे खात्याच्या पोलिसांनी अंगडी याना मानवंदना दिली.कोविड नियमानुसार या अंगडी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
अंतिम संस्काराला बेळगाव मधून लिंगायत स्वामीजी बाळयया हिरेमठ गेले होते.काल बुधवारी रात्री सुरेश अंगडी यांचे 65 व्या वर्षी कोविड मुळे निधन झाले होते.कर्नाटक भाजप नेत्यांनी त्यांचे पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र कोविड नियमानुसार दिल्लीतच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय झाला.
बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, सहकारमंत्री लक्ष्मण सवदी, राज्यसभा सदस्य इरान्न कडाडी,चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोलले, बेळगाव भाजपचे राजू चिकनगौडर यावेळी उपस्थित होते.
काल रात्रीच महसूल मंत्री अंगडी यांचे व्याही जगदीश शेट्टर हे दिल्लीला रवाना झाले होते त्याच्या नंतर त्यांचे सर्व कुटुंबीय देखील विशेष विमानाने दिल्लीला गेले होते.अंगडी यांची पत्नी मंगला,दोन मुली व त्यांचे जावई, त्यांचे भाऊ जवळचे नाते वाईक उपस्थित होते.
घरासमोर गर्दी
बेळगाव सदाशिवनगर येथील अंगडी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी अंगडी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मातोश्रीचे सांत्वन केले.भाजप कार्यकर्त्यांनी अंगडी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रध्दांजली वाहीली. यावेळी किरण जाधव,उजवला बडवाणाचे आदी उपस्थित होते.