कोल्हापूरच्या धर्तीवर बेळगावमध्येही जनता कर्फ्यूची मागणी नागरिक करीत असून शहरातील अंगोला परिसरात यासंदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती.
बेळगावमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून यावरील उपचारदेखील मिळणे कठीण बनत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी खबरदारी म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. आणि अडीज – तीन महिन्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. पण याचवेळी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. यादरम्यान नागरिकांकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु कोरोना हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील दररोजचा प्रश्न असून कोरोनासोबत जगायची सवय करून घ्या, अशा शब्दात सरकारने लॉकडाऊनसाठी नकार दर्शविला.
बेळगाव जिल्हा सर्वात जास्त कोरोनाबाधितांच्या संख्येत गणला जाऊ लागला. आणि कोरोनावरील उपचारात गोंधळ होत असल्याच्या बातम्याही पुढे येऊ लागल्या. खाजगी रुग्णालयात अवाढव्य पैसे उकळले जात आहेत. आणि सर्वसामान्य आजारांसाठी उपचार मिळणे कठीण झाले. या सर्व गोष्टींचा विचार करून नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कोल्हापूरप्रमाणे बेळगावमध्येही जनता कर्फ्यू चे आयोजन करण्याचे ठरविले आहे.
यासंदर्भात आज अनगोळ वाडा कंपाऊंड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, पंच मंडळी उपस्थित होते. या बैठकीत गाव मर्यादित जनता कर्फ्यू बाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अनेकनागरिकांनी जनता कर्फ्यूबाबत आपले विचार व्यक्त केले. अनगोळ भागात मध्यम वर्गीय कुटुंबीय मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच हातावर पोट चालणाऱ्या कुटुंबीयांनीही संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक घडीला फटका बसणार याची दक्षता घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा, वेळेचे बंधन ठेऊन व्यवहार सुरु ठेवावेत, आधीच तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून अंतिम निर्णय घ्यावा, असे आवाहन उपस्थितांकडून करण्यात आले.
जनता कर्फ्यूबाबत रविवारी दुपारी १२ वाजता अंगोला गावातील व्यापारी बांधवांची बैठक आदिनाथ भवन वाडा कंपाऊंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे कळविण्यात आले.
शनिवारी झालेल्या या बैठकीला गावातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंच मंडळी, माजी नगरसेवक, मोहन भांदुर्गे, किरण सायनाक, विनायक गुंजटकर, अनिल मुचंडीकर, राकेश पलंगे ,राजु भेंडीगेरी, वसंत ताहशिलदार, बाळू कदम, सुधीर भेंडीगेरी, प्रफुल्ल सोमणाचे, दिपक सोमनाचे, अरूण गावडे ,लक्ष्मण देमजी, बी. एस. शिंदोळकर, ए. ए. मुल्ला आदी उपस्थित होते.