बेळगाव हे एक सुंदर आणि शांत शहर आहे. त्यामुळे येथे कोणीही अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करूनये, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मार्केटचे नवनिर्वाचित सहपोलिस आयुक्त कट्टीमनी यांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला आहे.
शहर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेच परंतु समाजातील शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य असून पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य नागरिकांनी करावं असे आवाहन त्यांनी केले. बेळगाव शहरात अनेक वर्षे शांतता नांदत आहे. आगामी काळातही शहराची शांतता अबाधित ठेऊन कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे. काही समाजकंटकांकडून शहराला वेठीला धरण्याचे काम सुरु आहे. परंतु अशा समाजकंटकांना चांगला धडा शिकविला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीत मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेष शोवयोगी म्हणाले कि, शहरात गांजा, मटका, जुगार अशा गोष्टी वाढत चालल्या असून बेकायदेशीररित्या होणाऱ्या गोष्टींना आला घालण्यात येत आहे. आणि अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असून कायद्याचे उल्लंघन कारण्याऱ्यांना कायद्याचीच लाठी दाखवू. समाजात सर्वानी एकरूपपणे राहून शहराची शांतता अबाधित राखावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
यावेळी उपस्थितातून शहरातील अनेक समाजविघातक प्रकृतींवर लक्ष ठेवावे, तसेच शहरात गांजा विक्री-साठा, मटका, जुगार यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असून यावर कारवाईसाठी पाऊले उचलावीत, आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शांतता कमिटीच्या सदस्यांनी या बैठकीत केली.
यावेळी सुनिल जाधव, विनायक बावडेकर, संजय नाईक, माजी नगरसेवक मुजमल डोनी, बाबाजान मतवले, रमेश कळसणवर, जयश्री माळगी, सादिक यासह शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.