हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील लक्ष्मी नगर येथील समर्थ कॉलनी परिसरात एका खाजगी कंपनीच्या मोबाईल टॉवर ची उभारणी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या टॉवर मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून, शिवाय अतिशय उंचावर हा टॉवर उभारण्यात येत असल्याने आजूबाजूच्या इमारतींना भविष्यात धोका असल्याच्या कारणास्तव स्थानिकांनी विरोध दर्शविला.
यासंदर्भात येथील स्थानिकांनी हिंडलगा ग्रा. पं. कडे अर्ज केला होता. परंतु कपणत्याही परवानगी शिवाय नागरिकांचा विरोध डावलून सोमवारी पुन्हा हा टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. टॉवर उभारणीसाठी मागील महिन्यापासून हे कामकाज हाती घेण्यात आले होते.
परंतु त्यावेळीही या परिसरातील नागरिकांनी हे कामकाज त्वरित थांबविण्याची सूचना केली. त्यानंतर पुन्हा महिनाभराच्या अवधीनंतर हा टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रातोरात या टॉवरसाठी लागणारे साहित्य सदर ठिकाणी उतरविण्यात आले होते. हा सारा प्रकार लक्षात घेऊन तातडीने सर्व स्थानिकांनी एकत्रित येऊन संबंधित कंत्राटदाराला घेराव घातला.
यासंदर्भात येथील स्थानिकांनी १७ सप्टेंबर रोजी ग्राम पंचायतीला निवेदन सादर केले होते. तसेच ग्राम पंचायत पीडीओंशी संपर्क साधला असता, अशा टॉवरची कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबतीत कोणतीही कल्पना नसल्याने कंत्राटदाराला याठिकाणी बोलाविण्यात आले. परंतु कंत्राटदाराने पंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक नसल्याचे सांगितले. यावेळी नागरिकांचा विरोध असूनही टॉवर उभारणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न यावेळी कंत्राटदाराला विचारण्यात आला.
टॉवरचे कामकाज थांबविण्यात आले नाही, तर सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा पवित्र घेतला. यावेळी ग्राम पंचायत सदस्या दळवी, अरुणा भातकांडे, कर्नल रमेश भट, मर्लिन फर्नांडिस, कॅप्टन प्रभाकर गवस, आरकॉज गोदड यांच्यासह परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या विरोधानंतर कंत्राटदाराने आपला बोऱ्या-बिस्तर आटोपून हे कामकाज त्वरित थांबविले आणि तेथून रवाना झाल्याचे वृत्त स्थानिकांनी दिले आहे.