शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या तालुका भागातील कंग्राळी खुर्द या गावात अनेक राजकारणी, मान्यवर रहात असूनही कंग्राळी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील रस्त्याची समस्या असो वा कचऱ्याची. पाण्याची समस्या असो किंवा स्मशानभूमीची. कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ नसल्यामुळे आलबेल नगरी प्रमाणे येथील रहिवासी वास्तव्य करीत आहेत.
मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामकाजामुळे नागरिक हैराण झाले आहेतच. परंतु याव्यतिरिक्त इतर अनेक मूलभूत सुविधांची वानवा याठिकाणी जाणवत आहे. रस्ते, गटारी, कचरा समस्या, या भागातून वाहणाऱ्या नदीत मार्कंडेय नदीची समस्या अशा अनेक समस्यांसह येथील सर्वात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे स्मशानभूमीचा अभाव. स्थानिक रहिवाशांसहित बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे येथील लोकसंख्येत वाढ झाली असून या संपूर्ण गावासाठी एका स्मशानभूमीची सोयही बेळगाव प्रशासनाला अजूनपर्यंत करता आली नाही, हि शोकांतिका आहे.
गेल्या अनेक वर्षात या गावासाठी सरकारी स्मशानभूमीची व्यवस्था नसून एका खाजगी जागेत अंत्यविधी उरकले जातात. ज्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात तेथील आजूबाजूच्या परिसरात अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी ठोस अशी जागा उपलब्ध नाही की शेडची व्यवस्था नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंत्यसंकार करणे अडचणीचे ठरते. शेडची सोय नसल्यामुळे अनेकवेळा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहतात. ज्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात, त्याठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, अंत्यविधीचे साहित्य चारीबाजूने विखुरले आहे. याठिकाणी शेळी बांधल्या जातात. गायी बांधल्या जातात. आणि रक्षाविधीच्या निमित्ताने ठेवण्यात येणाऱ्या अन्नासाठी अनेक कुत्री याठिकाणी जमा होतात. या सर्वांमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना येथे पाण्याची सोय नाही. की ऊन-पावसात थांबण्यासाठी एखाद्या सावलीची सोय. शिवाय या स्मशानभूमीत जाण्यासाठी चक्क चिखलातून मार्ग काढून जावा लागतो. अंत्यविधी करताना जिथे जागा मिळेल, अशा चारी दिशेला नागरिकांना थांबावे लागते.
यासंदर्भात या विभागात राहणाऱ्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या स्मशानभूमीची संपूर्ण माहिती सांगितली. हि स्मशानभूमी कोणत्याही प्रशासनाने मंजूर केली नसून गावात असणाऱ्या भाऊबंदकीच्या जागेवर उभी आहे. सुरुवातीला मोजकी लोकसंख्या असल्यामुळे आणि हि जागा माळरान असल्यामुळे याठिकाणी अंत्यसंस्कार उरकण्यात येत होते. त्यानंतर जसजशी लोकसंख्या वाढू लागली तसतशा मोकळ्या जागेचे रूपांतर निवासी जागेत झाले. सध्या असलेल्या स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या परिसरातील जागा अनेक विविध समाजांनी हस्तगत केल्या असून त्या जागांची विक्री केली आहे. आणि याठिकाणी घरे बांधण्यात आली आहेत.
या स्मशानभूमीच्या चारही दिशांना विविध विभागांच्या जमिनी आहेत. त्यात एका बाजूला एपीएमसीच्या मालकीची जागा, एका बाजूला लमाणी समाज, एका बाजूला क्वारी मालक, कुमार स्वामी ले-आउट, आणि एका बाजूला गावठाण जमीन. या संपूर्ण गावासाठी एकही स्मशानभूमी नसून स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायत, एपीएमसी प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु अजूनपर्यंत आश्वासनांची खैरात देण्याव्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी स्मशान भूमीसाठी जागा मंजूर करण्यात आली नाही. निदान ५ गुंठे जागा मंजूर करावी, यासाठीही अनेकदा एपीएमसी अध्यक्षांचे दरवाजे ठोठावले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्यावतीने आणि ग्रामपंचायतीच्या सभासदांच्यासह आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु आजतागायत स्मशानभूमीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने या निवेदनाला प्रतिक्रिया दिली नाही. एखाद्या वेळेला रहायला जागा कमी असेल तर चालेल परंतु लोकसंख्येच्या दृष्टीने या गावात एखाद्या उचित ठिकाणी स्मशानभूमी मंजूर करावी, यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे दरवाजे आपण ठोठावले आहेत, अशी माहिती जिल्हा पंचायत सदस्यता सरस्वती पाटील यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, मी पुढाकार घेऊन गावातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला होता. प्रत्येक घरातून ३० रुपये शुल्क आकारून कचरा गाडीची व्यवस्था केली होती. परंतु काही असंतोषी लोकांनी अचानकपणे हि गाडी येण्यासाठी विरोध दर्शविला. आणि त्यामुळे संपूर्ण गावात कोठेही कचरा टाकण्यात येऊ लागला. प्रशासनाच्या वतीने आम्हीही संपूर्णपणे जनतेच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्याच्या प्रयत्न करतो. परंतु अशा बाबतीत जनतेनेही समाजाचे देणे आहे, या उद्देशाने आपले कर्तव्य पार पडावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकंदर कंग्राळी खुर्द गावची परिस्थिती पाहता या गावात अनेक मान्यवर मंडळी आहेत. यांच्या पुढाकारातून या गावचा विकास करणे शक्य आहे. जनतेच्या रोषापुढे प्रशासन नेहमीच झुकते. परंतु हा रोष योग्य गोष्टीसाठी असला पाहिजे. सध्या ग्रामपंचायत निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्यातरी स्मशानभूमी साठी जागा मिळणे मुश्किल आहे. परंतु जनतेने स्मशानभूमीसहित गावचा विकास करण्यासाठी आता पुढे सरसावले पाहिजे. शिवाय या भागात असणाऱ्या अनेक मान्यवर मंडळींनी गावच्या विकासासाठी आपला सहभाग आणि सक्रियता दर्शविण्याची गरज आहे.