बेळगावमधील सांबरा विमानतळावर अधिकाधिक उड्डाणे आणि विमान सेवेत सातत्याने प्रगती होत असून ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक उड्डाणे करणाऱ्या यादीत राज्यात बेळगाव विमानतळाचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑगस्ट महिन्यातील हवाई वाहतुकीच्या आकडेवारीनुसार बंगळूर आणि मंगळूर नंतर बेळगाव कर्नाटकात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट महिन्यात बंगळूर हे सर्वात जास्त प्रवासी संख्येसह आघाडीवर असून त्यानंतर मंगळूर, बेळगाव, कलबुर्गी, म्हेसुर, हुबळी आणि विजयनगर यांचा समावेश आहे. कोरोनासारखा सांसर्गिक रोग संपूर्ण जगभर पसरला असून आंतरराज्य विमानसेवा काही नियमावलीसह सुरु करण्यात आली आहे. या कालावधीत बेळगावमधून होणाऱ्या हवाई उड्डाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक एअरलाइन्सनी कोविड संदर्भात वेळापत्रकही जाहीर केले आहे. ऑगस्ट महिन्याप्रमाणे सप्टेंबर आणि ऑकटोबर महिन्यातही या विमानतळावरून अधिकाधिक उड्डाण भरण्याची दाट शक्यता आहे.
याप्रमाणेच जून महिन्यात हेदराबाद येथे सर्वाधिक हवाई वाहतूक झाली असून विविध ठिकाणाहून हैद्राबादसाठी २२९२ जणांनी हवाई प्रवास केला असून हैद्राबाद येथून बेळगाव विमानतळावर येण्यासाठी २७९४ जणांनी हवाई प्रवास केला आहे. सध्याच्या हवाई वाहतूक आकडेवारीनुसार बंगळूर आणि हैद्राबाद या शहरातील विमानतळ हे सर्वाधिक वाहतूक करणाऱ्या विमानतळाच्या टॉप यादीत आहेत.
बेळगावमधील विमानतळाचा विकास जलद गतीने करण्यात येत आहे. मागील काही कालावधीत या विमानतळावरील सेवा स्थगित करण्यात आली होती. परंतु प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पुन्हा हे विमानतळ सुरु करण्यात आले. या विमानतळावरून अनेक कंपन्यांची विमाने उड्डाण करत असून प्रवासी वर्गानेही सांबरा विमानतळाला अधिक पसंती दिली आहे. खासदार कै. सुरेश अंगडी यांनी या विमानतळाचा विकास उच्छ स्तरावर करण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने कामकाजाला सुरवातही करण्यात आली. सांबरा विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जाही वाढविण्यात आला. विमानतळावरील सोयी सुविधांच्याबाबतीतही लक्ष पुरविण्यात येऊ लागले. मध्यन्तरी अचानक कोविड मुळे काही काळ ही सेवा स्थगित झाली परंतु लॉकडाऊन नंतर सुरु करण्यात आलेल्या विमानतळावरील हवाई वाहतुकीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हवाई वाहतुकीची आकडेवारी अशी आहे
ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020
विमानांची उड्डाणे 418- 444 -391
प्रवासी 17914 -14147 /10224
राज्यातील क्रमवारी 3 -2 -2