हेस्कॉमच्या गलथानपणाचा फटका नेहमीच नागरिकांना बसत आला आहे. गणेशोत्सवाच्या आधीपासून अनेक ठिकाणी जोरदार वारा-पावसामुळे विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याप्रकरणी दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले. परंतु आजपर्यंत विजेचा लपंडाव अनेक भागात सुरु असून नागरिकांना याचा फटका बसत आहे.
शहरातील उज्वल नगर येथे अशाच एका टीसीचे कामकाज रविवारी सुरु होते. परंतु यासाठी येथील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नाही. दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर दिवसभर वीज ये – जा करत होती. आणि अचानक हाय वोल्टेज मुळे येथील अनेकांच्या घरातील विद्युत उपकारांमध्ये बिघाड झाला. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता, त्यांनी समर्पक उत्तरे न देता हेस्कॉम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. हेस्कॉम कार्यालयाला संपर्क साधला असता झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
उज्वल नगर येथील स्थानिक रहिवासी हुदलीकर यांच्या टीव्हीचे नुकसान झाले. लॉकडाऊन मुळे आधीच आर्थिक स्थिती खालावली असून अनेकांनी हप्त्यावर घेतलेली उपकरणे जाळून खाक झाली आहेत. आणि याचा नाहक भुर्दंड आता येथील नागरिकांना सोसावा लागणार आहे. याव्यतिरिक्त येथे असलेल्या कुरबुर यांच्या दूध डेअरीमध्येही २०० लिटर दूध वाया गेले आहे. पूर्वसूचना न मिळाल्यामुळे नेहमीप्रमाणे साठा करून ठेवलेले २०० लिटर दूध गटारीमध्ये ओतण्याची वेळ आली. येथील अनेक रहिवाशांच्या वीज उपकरणांमध्ये हाय वोल्टेजमुळे बिघाड झाला असून याचे नुकसान कसे भरून काढावे, या विवंचनेत असणाऱ्या नागरिकांनी हेस्कॉमच्या गलथानपणाचा निषेध नोंदविला आहे.
शहरासह उपनगरातदेखील हेस्कॉमच्या गलथानपणाचा फटका नागरिकांना बसत असून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरु असतो. उन्हाळ्याचे दिवस असून कोरोनामुळे अनेक नागरिक घरीच आहेत. अनेक नोकरदार वर्ग “वर्क फ्रॉम होम” करत आहेत. परंतु विजेच्या या लपंडावामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे हेस्कॉमने पूर्वकल्पना देऊनच दुरुस्तीची कामे किंवा भारनियमन करावे, अशी मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.