बेळगाव शहरात कचरा संकलन करणाऱ्या अनेक गाड्या तैनात आहेत. दररोज सकाळी आपली विशेष अशी “धून” वाजवत अपवाद वगळता या गाड्या प्रत्येकाच्या दारासमोर येतात. परंतु नागरिकांना चौकाचौकात, आडवळणावर किंवा झाडाझुडुपांत कचरा टाकण्यात धन्यता मिळते.
शहर-परिसरातील अशाच नागरिकांना आता चांगलाच धडा देण्याचे महानगरपालिकेने ठरविले आहे.
मनपा हद्दीत येणाऱ्या २० ठिकाणी “ब्लॅक स्पॉट” ठरविण्यात आले आहेत. ही अशी ठिकाणे आहेत जिथे नागरिक “कचरा टाकू नये” असा फलक वाचून देखील बिनधास्तपणे कचरा टाकतात. हे असे उपद्व्याप रोखण्यासाठी महानगर पालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने या २० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे ठरविले आहे.
या सीसीटीव्ही मध्ये कचरा टाकताना कैद होणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कंट्रोल रूममध्ये या सीसीटीव्हीचे चित्रण पाहण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे. आणि जे नागरिक या सीसीटीव्ही मध्ये कचरा टाकताना कैद होणार आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
आरपीडी क्रॉस, दत्त गल्ली-शहापूर, सावरकर रोड फस्ट गेट, उषाताई गोगटे हायस्कुल, शेरी गल्ली-राजमहल हॉटेल, वीरभद्र नगर, डेरी कंपाउंड, केईबी रोड आझाद नगर, एसपीएम रोड, दुसरा क्रॉस नेहरू नगर, काकतीवेस रोड, कावेरी कोल्ड ड्रिंक्स, प्रकाश थिएटरसमोर, जोशी मळा कॉर्नर, खासबाग, गुलमोहोर कॉलनी आदी परिसरांचा या ‘ब्लॅक स्पॉट’ मध्ये समावेश आहे.