केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा याला विरोध करण्यासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याच्या तयारीत असणाऱ्या व हायवे अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व सुटका केली.
केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधातील असून हे कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ, हसिरू सेना, नारायनगौडा, शिवरामगौडा, कर्नाटक नवनिर्माण सेना, दलित संघटनांसह विविध संघटनांच्या वतीने चन्नम्मा सर्कल पासून सुवर्ण विधानसौधपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला होता.
या निषेध मोर्चाला चन्नम्मा सर्कलपासून सुरुवात झाली. मोर्चा लवकर सुरू करून पुढे मार्गस्थ करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना सांगितले. परंतु यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर खडेबाजार मध्ये मोर्चा आल्यानंतर काही दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. ही दुकाने बंद करण्यासाठी आंदोलकांनी जबरदस्ती केली. पोलिसांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला. आणि याठिकाणीही पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.
यावेळी सुवर्णविधानसौधसमोरील राष्ट्रीय महामार्गावर मंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येऊन सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रतिकात्मक प्रेतयात्रेला पोलिसांनी विरोध दर्शवत आंदोलनकर्त्यांना अटक केली. आंदोलनकर्त्यांनी सुवर्णसौधला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादी होऊन निदर्शने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक करून बसमध्ये जबरदस्तीने बसवण्यात आले. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी सुवर्णसौध परिसर दणाणून गेला होता. पोलिसांच्या आडून गुंडगिरी करणाऱ्या सरकारचा निषेध असो, आमच्या जमिनीवर आमचाच हक्क आहे, या आणि अशा अनेक घोषणांनी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला.