Saturday, December 21, 2024

/

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

 belgaum

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज संपूर्ण राज्यभर विविध ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकीचा प्रकार घडले.

केंद्र आणि राज्य सरकारने भू-सुधारणा कायदा विधेयक, एपीएमसी विधेयक अंमलात आणले आहे. या विधेयकांमुळे शेतकरी अडचणीत येणार असून हे कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी आज कर्नाटक बंदची हाक देण्यात आली होती. यादरम्यान बेळगावसह, बंगळूर, हुबळी, हासन, चिक्कमंगळूर, म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, शिवमोग्गा, कोडगु, मंगळूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनानी सरकारविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकर्यांच्या विरोधातील या विधेयकांमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये शेतकरी देशोधडीला लागेल, शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव नाही, आणि ज्यावर शेतकऱ्याचे जीवनमान अवलंबून असते ती पिकाऊ जमीन बळकावण्याचे षडयंत्र सरकार रचत आहे. याविरोधात आज शेतकऱ्यांनी निदर्शने केली.

आज बेळगावमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात सुमारे ५०० हुन अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनाला आयटक, दलित संघर्ष समिती, कन्नड रक्षण वेदिका, बेळगाव नवनिर्माण सेना या संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्यभर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनात सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत होती. आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अंमलात आणलेले कायदे रद्द करण्यासाठी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.