शहरातील विविध मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी आज माजी नगरसेवकांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
कोविड – 19, लॉकडाऊन या सर्वांमुळे नागरिक हैराण झाले आहेत आणि अशातच पावसामुळे वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी सारख्या सामान्य आजारांनी नागरिक ग्रासले आहेत. शिवाय कोविडमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन नंतर अनेक लोक आर्थिक संकटांत सापडले आहेत. अशातच या सामान्य आजारांसाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार मिळणे कठीण झाले आहे. या सर्व कारणांमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.
मागील 15-20 दिवसंपासून वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणात निधन वार्ता प्रसिद्ध होत आहेत. सामान्य आजारावर योग्य उपचार न मिळाल्याने अशी वेळ नागरिकांवर येत आहे, अशी माहिती समोर येत आहे. सामान्य आजारासाठी खाजगी रुग्णालयात एकतर प्रवेश मिळत नाही किंवा मिळालाच तर उपचारासाठी भरमसाट पैसे आकारले जात आहेत.
याव्यतिरिक्त बेड्स, व्हेंटिलेटरची कमतरता असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचारविना राहावे लागत आहे. औषधलयातूनही औषधे उपलब्ध होत नाहीत. डॉक्टरांकडून थेट कोविड ची चाचणी करण्याच्या सूचना मिळत आहेत. या सर्व गोष्टींमुळे सामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहे.
बेळगाव शहराची स्मार्ट सिटी मध्ये गणना झाली. बेळगावसारख्या शहरातून 1 केंद्रीय मंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचीही वर्णी आहे. परंतु तरीही बेळगावची परिस्थिती अशी आहे.
महानगरपालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय अशा प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. शहरातील स्वच्छता राखा अशीही मागणी करण्यात आली.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी मनपा आयुक्तांनी प्रत्येक वॉर्डमध्ये भेट देऊन पाहणी करावी, नागरिकांचे प्रश्न ऐकून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शहरातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.