शहरातील मुख्य मार्ग म्हणून शनी मंदिर आणि पाटील गल्ली रस्ता पाहिला जातो. याठिकाणी व्यापार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक तसेच शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण होऊ लागले आहे. याकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष केले असून वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहेत. शनी मंदिर मुख्य रस्ता आणि पाटील गल्ली येथील मुख्य रस्त्यावर हे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यंतरी महानगरपालिकेने झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम राबवली होती. आता पुन्हा याची गरज निर्माण झाली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेऊन संबंधितांना तंबी देणेही गरजेचे आहे. अतिक्रमण केल्याने वाहनधारकांना प्रवास करताना मोठा अडथळा होत आहे. याच बरोबर काही व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर वाहने लावण्यास अरे तुरीची भाषा वापरण्यात येत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवून वाहन धारकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेने मध्यंतरी आस्थापने आणि रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम तीव्र केली होती. कोरोना काळात ही मोहीम बंद पडली असून आता पुन्हा एकदा ही मोहीम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या तरी शनी मंदिर आणि पाटील गल्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून महानगरपालिकेने अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.