राज्यभरात अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले आहे. युवापिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणानंतर अनेक रॅकेट्स उघडकीस येत आहेत. बेळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम मुंबई आणि त्यानंतर बंगळूरच्या फिल्म इंडस्ट्री मधून काही रॅकेट्सचा पर्दाफाश करण्यात आला असून बेळगाव जिल्हा पोलिसांनी मागील १० दिवसात यासंदर्भातील जवळपास २० जणांना ताब्यात घेतले असून १५० किलो अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. अमली पदार्थांचा साठा करणे आणि त्याची विक्री करणे या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी आयाज शरीफ सौदागर, (वय ३३ वर्षे, रा. रुक्मिणी नगर, बेळगाव), आरिफ इब्राहिम मुल्ला (वय २६ वर्षे, रा. जुने बेळगाव), नाईकवाडी (वय ३७ वर्षे, रा. अशोक नगर, बेळगाव), इम्रान कासीम मुल्ला (वय ३३, रा. शिवाजीनगर, बेळगाव) याना जांबोटी येथे अटक करून २.१ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय निपाणी, कुडची, बैलहोंगल, खानापूर आणि चिकोडी पोलीस स्थानकातही इतर आरोपीना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थांच्या सेवनामुळे युवापिढी नशेच्या आहारी जात असून चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आहे. शिवाय यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येही वाढ होत चालली आहे. युवापिढीचे भविष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढे सरसावले आहे.