बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तपदी विराजमान असणाऱ्या आयपीएस अधिकारी सीमा लाटकर यांची नुकतीच बेळगाव पोलीस विभागातून बदली झाली. बेळगाव जिल्ह्यात नेहमीच प्रत्येकाचे आदरातिथ्य केले जाते. जुलै २०१७ पासून सेवेत रुजू असणाऱ्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बेळगावने दिलेल्या या आदरातिथ्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जुलै २०१७ पासून कार्यरत असताना बेळगावमध्ये सेवा बजाविणे हा सर्वात आव्हानात्मक आणि खडतर असा अनुभव होता. स्वातंत्र्य चळवळीपासून सहभाग असणाऱ्या बेळगावचा शांततापूर्ण, आणि व्यापार – उद्योगाचे केंद्र असणारा असा इतिहास आहे. अशा शहरात सेवा बजाविणे हे माझ्यासाठी गौरवपूर्वक कार्य होते. बेळगावमध्ये सेवा बजाविताना मी प्रामाणिकपणाने कार्य केले आहे. माझ्या कार्यकाळात राज्यकर्ते, प्रसार माध्यमे, युवा पिढी, विविध समाजाचे नेते, मान्यवर, महिला, जिल्हा प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी मनापासून मला सहकार्य दिले. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे, असे विनम्रतापूर्वक मत त्यांनी व्यक्त केले आहे.
कोविड-१९ काळात पोलिसांसमोर अभूतपूर्व असे आव्हान होते. परंतु बेळगावच्या प्रत्येक घटकाने यामध्ये सहकार्याची भूमिका बजावली, त्यामुळे याकाळात कोविड मुले उद्भवलेल्या परिस्थितीचा योग्य प्रकारे आम्ही सामना करू शकलो. माझ्या कार्यकाळात माझ्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सहकार्यांनी मला भरभरून पाठिंबा दिल्याचीही प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यात अनेकवेळा अनेक प्रसंग सामोरे आले. परंतु सर्व पोलीस विभागाच्या सहकार्याने बेळगावला शांतताप्रिय बनविण्यासाठी आम्ही सर्वांच्या सहकाराने प्रतिकूल परिस्थितींविरूद्ध रात्रंदिवस परिश्रम घेतले. आणि यावेळी सेवा वाजविताना मी माझ्या कामाचा आनंद लुटला आहे.
बेळगावमध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला समाधान मिळाले आहे, येथे घालवलेला वेळ आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मला बेळगावमध्ये मिळालेला अनुभव मी कधीही विसरणार नाही. बेळगावसोबत एक जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शिवाय बेळगावकरांनी दिलेल्या प्रेम, आदराप्रती त्यांनी गौरवोद्गार काढून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विक्रम आमटे यांनी स्वीकारला पदभार