डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे कोविड रुग्णांच्या नोंदी ठप्प झाल्याची माहिती कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे कोरोना रुग्णांची वाढीव संख्या, कोरोनमुक्त रुग्णांची संख्या तसेच कोरोनामृतांची संख्या जाहीर करण्यात आली नाही. डॉक्टरांनी यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाला पाठविला नसल्यामुळे बुधवारी प्रसारित झालेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये कोविड संदर्भात नोन्द करण्यात आली नसल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.
बुधवारी जिल्ह्यात २४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण तर ४८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु इतर जिल्ह्यात कोरोनाच्या शून्य केस नोंद करण्यात आल्या आहेत. बगलकोटमध्ये एकही रुग्णाची नोंद नाही तर उडुपीमध्ये केवळ एकाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच बळ्ळारी, धारवाड, हासन, कोडगु, शिवमोग्गा या जिल्ह्यांमध्ये डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची अधिक नोंद झाली आहे.
डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामध्ये कोविड रुग्णांचा डेटा न देण्याचा पवित्र घेतला आहे. त्याचप्रमाणे सर्व ओपीडी सेवाही स्थगित करण्याचे ठरविले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा न देण्याचा इशाराही सरकारला देण्यात आला आहे.
काल राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. बी. श्रीरामुलू यांनी डॉक्टरांचा संप मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. डॉक्टरांच्या मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु महामारीच्या काळात डॉक्टरांनी सेवा स्थगित न करता सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.