जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेले पोस्ट ऑफीस भडकल गल्ली येथे ५ वर्षांमागे स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे वकिलांसह सरकारी कर्मचारी आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांसह, नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यामुळे हे पोस्ट ऑफीस पुन्हा न्यायालय आवरत स्थापन करण्यात यावे, यासाठी आज वकिलांनी आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
न्यायालयात अनेक व्यवहारांची पूर्तता होते. तसेच अनेक वकीलही आपल्या व्यवहाराच्या कारणास्तव पोस्ट ऑफिसचा वापर करतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन न्यायालय आवारात पोस्ट ऑफिसची स्थापनाही करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव हे पोस्ट ऑफीस भडकल गल्ली येथे मागील ५ वर्षांमागे स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे प्रत्येकाची गैरसोय होत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता जागेअभावी हे पोस्ट ऑफीस भडकल गल्ली येथे स्थलांतरित करण्यात आले होते.
आता न्यायालय आवार मोठा झाला असून याठिकाणी असलेल्या बेळगाव ज्युडिशियल को-ऑप. क्रेडिट बँकेच्या इमारतीमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित इमारतीच्या व्यवस्थापकांची अनुमती घेऊन याठिकाणी पोस्ट ऑफीस स्थापन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. शरद देसाई, ऍड. जी. दि. भाविकट्टी, ऍड. मोहन नंदी, ऍड. बसय्या हिरेमठ, ऍड. उदय तलवार, ऍड. कांबळे आदी हजर होते.