शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘कर्नाटक बंद’ च्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांसह खबरदारी बाळगण्यात आली आहे.
या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. या दरम्यान समाजात अशांतता पसरविणे किंवा कायदा हातात घेऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे.
या आंदोलनासाठी पोलीस विभागाच्या वतीने काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये व्यावसायिकांना व्यापार बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात येऊ नये, असे सांगितले आहे . त्याचप्रमाणे वाहतुकीला अडथळा करू नये, यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या रुग्णवाहिका, सार्वजनिक वाहतूक, अग्निशामक दलाची वाहने तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये. कोविड-१९ च्या पार्शवभूमीवर सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार हा बंद पाळायचा आहे.
यादरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चावेळी सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयातील कामकाजात अडथळा आणू नये. अशा सूचना पोलीस आयुक्त कचेरीतुन जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या विरोधातील संमत केलेल्या कायद्यांविरोधात उद्याचा कर्नाटक बंद घोषित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर समाजाच्या शांततेला तडा जाऊ नये, यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने सर्वतोपरी तयारी केली असून आंदोलनकर्त्यांनी कोविड च्या पार्श्वभूमीवर शांततेत उद्याचा मोर्चाचे आणि बंद पाळण्याचे आवाहन पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.