जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून नदीतीरावर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिले.
या बैठकीत नदीतीरावर निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीचा विषय मध्यस्थानी ठेवण्यात आला. बेळगाव जिल्ह्यात नदीतीरावर पूरपरिस्थिती निर्माण होते. यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात येणार असून नदीतीरावरील पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले कि, १९९४ साली महापुराचा सामना नदीतीरावरील जनतेला करावा लागला. परंतु त्यावेळी अवघ्या तीन तासातच पाण्याचा प्रवाह ओसरला होता. मागील वर्षीपासून पावसाचा ओघ वाढल्याने पुन्हा मलप्रभा, घटप्रभा, बळ्ळारी नाला, हिरण्यकेशीसह अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी नदीपात्र, नदीतीराचे परीक्षण करण्यात येईल. त्यावर सर्वेक्षण करून अहवाल मागणीवण्यात येणार आहेत. या अहवालानंतर आणखी एक बैठक आयोजिण्यात येईल, आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री बदलण्याबाबत जारकीहोळीना विचारणा केली. यावेळी ते म्हणाले कि, मुख्यमंत्री बदलण्याचा पक्षाचा विचार नाही. या सर्व अफवा आहेत. आणि या अफवा प्रसारमाध्यमांद्वारे पसरविल्या जात आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उमेश कत्ती यांना मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, उमेश कत्ती यांना मंत्रिपद मिळाल्यास मला आनंदच होईल. भाजपमध्ये प्रवेश करून विजयी झालेल्या उमेदवारांना मंत्रिपद मिळण्यासाठी मागणी करण्यात येतच आहे. शिवाय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कळस-भांडुरा प्रकल्पाबाबत विचारले असता ते म्हणाले कि, यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून पुढील बैठकीत यावर ठोस निर्णय घेतला जाणार आहे.