स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येत असलेला बेळगावचा विकास हा विद्रुपीकरण करण्यासारखा आहे, याबाबतीत होत असलेल्या चुका आणि योजनेतील त्रुटी स्मार्ट सिटी अधिकारी शशिधर कुरेर यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज सिटीझन कौन्सिल च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सविस्तर त्रुटी आणि होत असलेल्या चुकांबद्दल शशिधर कुरेर यांना निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत होत असलेला विकास हा पर्यावरणपूरक नसून केवळ सिमेंटीकरण करण्यासारखा आहे. बेळगावमध्ये मागील ६ वर्षांपासून एकही झाड रोवण्यात आले नाही. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनेक जुन्या झाडांची विकासाच्या नावाखाली कत्तल करण्यात येत आहे. मुळातच स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना या पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी ताळमेळ राखणाऱ्या असायला हव्यात. परंतु दिवसेंदिवस शहराचे विद्रुपीकरण होत असून सिमेंटचे जंगल उभे होत असल्याचा आभास निर्माण होत आहे.
विकास कोणाला नको आहे? प्रत्येक नागरिकाला आपल्या भागाचा विकास व्हावा, अशी इच्छा असते. सोयी सुविधा नीट असतील तर कोणताही नागरिक तक्रार करणार नाही. परंतु या विकासाचा किंमत जर पर्यावरणाला हानी पोहोचवून मिळणार असेल तर या विकासाला नागरिक विरोध दर्शविणारच. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाबाबतीत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत.
बेळगाव हे सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी जसे प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे निसर्गरम्य ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. नैसर्गिक वसा लाभलेले बेळगाव हे एकेकाळी वेणुग्राम म्हणून ओळखले जायचे. परंतु आताच विकास पाहता बेळगावचा निसर्ग लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी झालेल्या स्मार्ट सिटी योजनांतर्गत विकासात नैर्सर्गिक वारसा म्हणून अनेक झाडे जशीच्या तशी जोपासली जातात. स्मार्ट सिटी योजनेत निसर्ग संपन्न असा विकास होणे अपेक्षित आहे. परंतु बेळगावच्या स्मार्ट सिटीमध्ये निसर्गाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा भरणा अधिक आहे. टिळकवाडी सारख्या परिसराला मोठा वारसा आहे. परंतु या भागातील झाडांची कत्तल बेकायदेशीरपणे करण्यात येत असून रातोरात मोठी झाडे गायब होत असताना दिसत आहेत. यामुळे नैसर्गिक हानी तर होताच आहे. परंतु स्मार्ट सिटीत राहणाऱ्या नागरिकांना सिमेंटीकरण केलेला निसर्ग परवडणारा नाही.
ज्या स्मार्ट सिटीत स्वच्छ हवा घेण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे, त्या स्मार्ट सिटीमध्ये नागरिक कसे काय जगू शकतील? टिळकवाडी तिसऱ्या रेल्वेगेट पासून रेल्वे ओव्हर ब्रिज सहजपणे पाहता येऊ शकेल, अशा पद्धतीने झाडांची कत्तल करून रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे. शिवाय अनेक ठिकाणी केबलचे कामकाज सुरु असतानाही झाडांची कत्तल झाली आहे. झाडांची अशा पद्धतीने करण्यात येणारी कत्तल हा गंभीर विषय आहे, याकडे आपण गांभीर्याने लक्ष पुरवून हा प्रकार वेळीच रोखावा असे आवाहन सिटीझन कौन्सिलच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शशिधर कुरेर यांनी हा विषय आपल्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल सिटीझन कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. स्मार्ट सिटी अंतर्गत योजना राबविण्यात येत आहेत. परंतु विकास करत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. बेळगावमधील जनता सतर्क आहे, याबद्दल आपल्याला दिलासा मिळाला. याआधीही अनेक तक्रारी आल्या आहेत. परंतु निसर्गाची होत असलेल्या हानीबद्दल दुर्लक्ष करण्यात आले. बेळगावचा निसर्ग असाच अबाधित राहील, यासाठी पुढील काळात अशा गोष्टी होणार नाहीत, याची ग्वाही त्यांनी दिली. शिवाय कोणत्याही अनुमतीशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत कोठेही झाडे तोडण्यात येत असतील तर त्याचवेळी आपल्याला नावासहित तक्रार करा, त्याठिकाणचे फोटोज घेऊन व्हाट्सअप, ट्विटरद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवा, आपण त्यांच्यावर नक्की कारवाई करू. शिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत झाडे तोडण्यासाठी कोणतीही अनुमती नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्याकडून सल्ला घेण्यात येईल, आणि बेळगावमध्ये होत असलेल्या नैसर्गिक हानीवर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शशिधर कुरेर यांनी दिले.
या बैठकीदरम्यान शशिधर कुरेर यांच्यासमवेत कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, शेवंतालाल शहा, अरुण कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.