दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात एक ठराव पास करण्यात आला. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रख्यात नेता, शिक्षणतज्ञ तसेच एक सक्षम प्रशासक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे मंत्रिमंडळाने नमूद केले आहे.
सुरेश अंगडी यांचा जन्म १ जून १९५५ रोजी बेळगाव जिल्ह्यातील के के कोप्प या गावी झाला. त्यांनी एसएस समिती कॉलेजमधून पदवी शिक्षण प्राप्त केले तर राजा लखमगौडा महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. भारतीय जनता पक्षाचे ते सभासद होते. त्यानंतर बेळगाव जिल्ह्याच्या भाजप उपाध्यक्षपदी १९९६ साली त्यांची निवड झाली. त्यानंतर २००१ साली त्यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर २००४ साली त्यांनी खासदार पदाची निवडणूक जिंकली. मोठ्या मताधिक्याने त्यांनी १४व्या लोकसभेत खासदारपदी बाजी मारली. त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी पुन्हा खासदारपदी बाजी मारली.
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सभासदपदी त्यांनी काम पहिले आहे. मानव संसाधन विकास आणि संरक्षण तसेच अर्थ मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदीही ते कार्यरत होते. त्यानंतर २०१९ साली त्यांची रेल्वे राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. याचप्रमाणे सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग मोठा होता. औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गरिबांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरेश अंगडी एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना केली. वाचन आणि प्रवासाची अत्यंत आवड असणाऱ्या अशा नेत्याच्या अचानक जाण्याने केंद्रीय मंत्रिमंडळाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
संपूर्ण देशाच्या वतीने त्यांना आज मंत्रिमंडळाने त्यांना श्रद्धांजली वाहिली असून आज दिल्ली येथे राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरविण्यात आला होता.