आपल्या आरोग्याची भरपूर काळजी घेणारे कै. सुरेश अंगडी यांनी कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तापाच्या अधिक तिव्रतेकडे दुर्लक्ष करून सामान्य आजाराप्रमाणे हा आजार घेतल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दातदुखीने ग्रासलेल्या सुरेश अंगडी हे डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेले असता त्यांना ताप असल्याचे निदर्शनास आले.
दातदुखीमुळे ताप आला असल्याचे त्यांनी गृहीत धरले. तब्येत ठीक नसताना ते मुंबईला गेले आणि त्यानंतर दिल्ली येथे प्रयाण केले. तीन-चार दिवसानंतर ताप कमी झाला नसल्याने त्यांची कोविड तपासणी करण्यात आली.
या तपासणीत त्यांना कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यावर उपचार घेण्यासाठी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोविड ची चाचणी उशिरा करण्यात आल्यामुळे तसेच तापाची तीव्रता वाढल्यामुळे त्यांचा दिल्ली येथील एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.
एम्स रुग्णालयात त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीही करण्यात आली. परंतु याचा काहीच उपयोग अंगडी यांच्या तब्येतीवर झाला नाही. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर दिल्लीत होणार अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांसमवेत स्वामीजींचे प्रस्थान
बुधवारी दिल्ली येथे निधन झालेल्या रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंसनकार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कार विधीसाठी त्यांच्या कुटुंबियांसमवेत बेळगावचे स्वामीजी बाळय्या हिरेमठ दिल्ली येथे रवाना झाले आहेत.
त्यांच्या कुटुंबातील ९ सदस्य दिल्लीला रवाना झाले असून दिल्ली येथील लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीत अंगडिंच्या पार्थिवावर लिंगायत समाजाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश अंगडी यांचे पार्थिव बेळगाव येथी आणण्यासाठी त्यांचे चाहते प्रयत्नशील होते. यासाठी बेळगाव येथील सदाशिवनगर स्मशानभूमीसमोर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी गर्दी केली होती.
सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या आईला आणि मोठ्या भावालाही शोक अनावर झाला. आपल्या आईच्या नावावर के. के. कोप्प या गावात विविध शैक्षणिक संस्था असलेल्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार दिल्ली येथेच अंत्यसंकार करण्यात येणार आहेत. सरकारच्या नियमाबाहेर आपण नसल्याचे त्यांनी डॉ. सी. सी. अंगडी यांनी स्पष्ट केले.