बुडाला शहर आणि उपनगरातील जमिनी संपवल्या आहेत. त्यांचा डोळा आता ग्रामीण भागातील जमिनीवर आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. याचा विचार करून बुडाला ग्रामीण भागातील जमिनी घ्यायच्या असतील तर ग्रामपंचायत व तालुका पंचायतचे ना हरकत पत्र घेऊनच त्या ताब्यात घ्याव्यात. अन्यथा त्यांना एक इंची जमीन देऊ नका आणि जर अशी कोणतीही प्रक्रिया सुरू होऊ नये यासाठी त्यांना नोटीस पाठवा, असा ठराव मंगळवारी झालेल्या तालुका पंचायतच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आला आहे.
यापुढे तालुक्यातील कोणत्याही गावातील जमीन बुडाला देऊ नये. याच बरोबर अशी कोणतीही प्रक्रिया सुरू केल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उदय सिद्धनावर सुनील अष्टेकर नारायण नलवडे काशिनाथ धर्माजी आप्पासाहेब कीर्तने यांच्यासह आदींनी या मागणीला सहकार्य देत बुडाला नोटीस पाठवण्याचा ठराव करण्यात आला आहे. बुडाने 28 गावे समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.
या प्रस्तावाला ग्रामीण भागातील नागरिकांचा विरोध असल्याचेही या ठरावात म्हटले आहे. बेळगाव लगत असणाऱ्या उपनगरातील सर्व जमिनी बळकावण्यात बुडाने कोणतीही कसर सोडली नाही. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन प्लॉट पाडून विक्री श्रीमंतांना केली जाते. गरिबांना प्लॉट घेणे शक्य नाही. त्यामुळे बुडा श्रीमंतांसाठी काम करते का? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात 28 गावांचा समावेश आहे. जर या गावांचा बुडा मध्ये समावेश झाला तर येथील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी बुडा प्रयत्न करणार आहे. सध्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनीवर उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे तालुका पंचायत मधून अशा कोणत्याही हालचाली झाल्या तर तातडीने बैठक घेऊन त्याला विरोध दर्शवण्यासाठी साऱ्यांनीच सज्ज राहावे. जमिनी बळकावूनाऱ्या बुडाला नोटिस पाठवून कोणत्याही जमिनीला हात लावण्यापूर्वी पूर्व सूचना द्याव्यात आणि संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत पत्र बंधनकारक करावे असा ठरावही करण्यात आला आहे.
यामुळे यापुढे बुडाने कोणत्याही आगाऊपणा केला तर आम्ही गप्प बसणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी व तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी होते.