बुडाने जमीन संपादन करण्यासाठी पाठवलेल्या नोटिसीला नकार देत आपल्या जमिनी देण्यास अनगोळ येथील शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. यासाठी आज अनगोळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन सादर केले आहे.
बेळगाव नगर विकास प्राधिकरण (बुडा) च्या वतीने स्कीम नं. ६२ अंतर्गत अनगोळ आणि हलगा गावातील पिकाऊ जमीन निवासी जागेत रूपांतरित करण्यासाठी संपादन करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. परंतु येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाऊ जमिनी देण्यास नकार दर्शवित आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आणि निवेदन सादर केले.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. परंतु शहर विकास प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन असणाऱ्या शेतजमिनीच बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारच्या विरोधात जाऊन प्रकल्प राबविण्याचा शहर विकास प्राधिकरणाने सपाटा लावला आहे.
याआधीही विनाकारण अनगोळ येथे बुडा अंतर्गत असे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. निवासी जमिनीत रूपांतर करण्यासाठी इतर ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. लॉकडाऊन मुळे आम्ही शेतकरी अडचणीत सापडलो आहोत. शिवाय पिकाऊ जमिनींवरच आमचे जीवन अवलंबून आहे. शेती व्यतिरिक्त आमचे कोणतेही उत्पन्न नाही. त्यामुळे ही जमीन देण्यास नकार दर्शवत जारी केलेली नोटीस मागे घेण्यात यावी, यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.

धान्य, भाजीपाला आणि इतर पिके या जमिनीतून घेतली जात असून ही सुपीक जमीन बळकावून या ठिकाणी निवासी जागा निर्माण करणे हा गुन्हा आहे. शहर परिसरात अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत. त्याठिकाणी बुडाने निवासी जागेचा प्रकल्प राबवावा. आमच्या पिकाऊ जमिनी कदापिही बुडाला संपादनासाठी देणार नाही. जारी केलेली नोटीस मागे घेण्यात यावी. आणि कोणताही शेतकऱ्याला जबरदस्ती करता कामा नये, अन्यथा याविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बुडा आयुक्तांशीही चर्चा करण्यात आली. यावेळी बुडा आयुक्तांनी जमीन देण्यास नकार असलेल्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक अर्ज मागविला आहे. हे निवेदन सादर करताना अनगोळ भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.