बेळगावमध्ये मागील आठवड्यापासून रहदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर ठिकठिकाणी रहदारी पोलिसांनी नागरिकनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यास सुरुवात केली. परंतु शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे मात्र रहदारी पोलीस विभागाचा कानाडोळा होत आहे.
बेळगाव मदगयवरती बस स्थानकाजवळ गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु याठिकाणी रहदारी पोलिसांच्यावतीने मात्र दुर्लक्षच करण्यात आले आहे. या वाहतुकीमुळे नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर रहदारी पोलीस विभागाच्या वतीने तोडगा काढण्यात येईल की हि समस्या अशीच कायम राहील? अशी विचारणा नागरिक करत आहेत.
दुसऱ्या बाजूला हायस्ट्रीट कॅम्प येथे मागील आठवड्यात चुकीच्या बाजूला पार्किंग करण्यात आल्याच्या कारणास्तव प्रार्थनास्थळात आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.
परंतु याचठिकाणी चुकीच्या दिशेला पोलीस वाहन थांबलेले आढळून आले आहे. तर त्याआधी बी. एस. येडियुरप्पा मार्गावर दुचाकीस्वाराला अडवून हेल्मेटसक्तीची कारवाई करण्यात आली होती. शिवाय कायदा हातात घेऊन कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. याला तमाम नागरिकांनी विरोध दर्शवून रहदारी पोलिसांच्या बाबत संताप व्यक्त केला होता.
वाहतुकीचे नियम आणि अटी या जनतेच्या फायद्याच्याच आहेत हे जरी खरे असले, तरी वाहतुकीची समस्या सोडविणे आणि त्यासोबत वाहतुकीसाठी योग्य सुविधा पुरविणे हेही तितकेच महत्वाचे आहे. ज्यापद्धतीने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग सरसावते त्याचप्रमाणे जनतेला सोयीही तितक्याच चांगल्या प्रकारच्या पुरविणे याची जनताही आशा ठेवते, हि विसरून चालणार नाही.