Monday, December 23, 2024

/

बेळगावच्या शिवसेनेला नेतृत्व बदलाची गरज

 belgaum

सीमाभागातील शिवसेनेत मागील काही वर्षांपासून शिवसेनेच्या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काही नेते स्वयंघोषित पदभार स्वीकारून आपल्या स्वतंत्र बॅनरखाली कार्यक्रम राबवत आहेत. तर काही नेते आपल्या जुन्या पदभारासह शिवसेनेतील स्थान गाजवत आहेत. या सर्वांमुळे सीमाभागातील शिवसेनेत दुफळी पडली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मागील आठवड्यात सहसंपर्क प्रमुख अरविंद नागनुरी आणि हणमंत मजूकर जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून आले. अरविंद नागनुरी यांच्या एका पत्रानंतर शिवसेनेच्या नेतृत्वात बदल होण्याची शकयता वर्तविली जात होती. त्यानंतर या पत्राला हणमंत मजूकर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे उत्तर दिले. शिवसैनिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

हा एकंदर प्रकार पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीनंतर मराठी माणसाचा आधारवड असलेल्या शिवसेनेत गटा-तटाचे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. सीमाभागात आधीच मराठी माणसाला कोणी वाली नाही. मराठी माणसाच्या प्रश्नावर त्यांच्या समस्यांवर आवाज उठविणारा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारा एकही पक्ष नाही. मराठी माणसाची त्याच्या न्याय्य हक्कासाठी फरफट होत आहे. आणि अशावेळी पदासाठी राजकारण सुरु आहे. त्यामुळे आता सीमाभागातील शिवसेनेत नेतृत्व बदलाची गरज असल्याची मागणी समस्त शिवसैनिक आणि तमाम मराठी माणसाकडून केली जात आहे.

या सर्व वादामुळे सीमाभागातील शिवसेनेत पुनर्र्चना करण्याची मागणी उफाळून येत आहे. गेली कित्येक वर्षे कार्यरत असणाऱ्या सीमाभागातील शिवसेनेने मराठी माणसासाठी नेहमीच कार्य केले आहे. मराठी माणसाची बाजू मांडण्यासाठी महानगरपालिकेत 13 नगरसेवक निवडून आले होते. तर प्रकाश शिरोळकर यांनी उपमहापौरपदी विराजमान होऊन मराठी माणसाचा आवाज महानगरपालिकेत गाजवला होता.

Shivsena
Shivsena

सीमाप्रश्नासाठी तळमळीने कार्य करणारी शिवसेना सध्या पदाच्या राजकारणावरून स्वतःमध्येच गुरफटलेली दिसून येत आहे. एकेकाळी अग्रेसर असणाऱ्या सीमाभागातील शिवसेनेला अवकळा आली आहे. त्यामुळे आधीच्या नेतृत्वाबरोबरच नव्या नेतृत्वाची सांगड घालत सीमाभागातील शिवसेनेची पुनर्र्चना करण्याची गरज आहे.

मागील ५ ते ६ महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागात सक्रिय होत आहे. या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. समस्या सोडविण्यात अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतही राष्ट्रवादीने चांगले कार्य केले आहे. परंतु या तुलनेत शिवसेनेचे कार्य म्हणावे तितके दिसून आले नाही. पदांच्या राजकारणात गुरफटलेल्या पदाधिकाऱ्यांना समाजाशी देणे – घेणे नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

सीमाभागात १५० ते २०० युवकांनी युवा सेना स्थापण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या युवकांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व युवकांना एकत्रित आणून युवा सेना स्थापन करावी, जेणेकरून सीमाभागातील झोपी गेलेला युवावर्ग पुन्हा एकदा तळमळीने कार्य करण्यासाठी तत्पर होईल. यासोबतच शिवसेना पदाधिकाऱ्यांचीही पुनर्र्चना करून नेतृत्व बदल करण्याची मागणी जुन्या-जाणत्या शिवसैनिकांकडून तसेच मराठी माणसाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.