महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी बेळगाव शिवसेनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपुरुष आणि सन्माननीय व्यक्तींसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात भाषिक, धार्मिक तेढ निर्माण करून समाज शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेला तडा पोहोचविण्याचे कार्य काही समाजविघातक प्रकृतींकडून करण्यात येत आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सायबर पोलीस स्थानकात रीतसर तक्रार नोंद करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सुभाष आनंदाचे आणि सत्यनारायण वेलपुला यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. शिवाय शिवसेनेमध्ये कोणतेही पद न मिळाल्याने त्याचा वैयक्तिक राग सुभाष आनंदाचे या व्यक्तीकडून काढला जात असून शिवसेनेला बदनाम करण्याचे कार्य करण्यात येत आहे.
केवळ पोटतिडिकीने अशाप्रकारची विधाने करून वैयक्तिक स्वार्थापोटी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी दिली.
हे निवेदन सादर करताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपतालुकाप्रमुख पिराजी शिंदे, उपशहर प्रमुख प्रवीण तेजाम, प्रकाश राऊत, राजू तुडयेकर, राजकुमार बोकडे, दत्त जाधव, वैजनाथ भोगण, विजय सावंत, प्रकाश हेब्बाजी, रोहन लंगरकांडे, धनंजय पाटील, किरण हुद्दार आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.