महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी अश्फाक मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून स्विफ्ट कारमध्ये साठवलेला ४० किलो गांजा तसेच महिषाळ जत येथील पंप हाऊसजवळ साठवलेला ७८ किलो गांजा जप्त केला आहे. यासह गांजा विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन आणि गांजा वाहतूक करणाऱ्या वसीम शेख या आरोपीला अटक केली आहे.
चिकोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अश्फाक मैनुद्दीन मुल्ला यावेळी पळून जाण्याच्या तयारीत होता. यामुळे हा खटला जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. बेळगाव गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हि कारवाई करून अश्फाक मुल्ला या आरोपीला अटक करून त्याच्याकडील गांजा जप्त केला आहे. यासह २ किलो ग्रॅम वजनाची सुमारे २४ लाख किमतीची ६० गांजाची पाकिटे, स्विफ्ट कार आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ कोटी ८५ लाख इतकी आहे. वारंगळ आणि तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील दोन व्यक्तींकडून गांजाची आयात करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या अश्फाक मुल्ला या आरोपीने यासंदर्भात कबुली दिली असून सांगली, मिरज, चिकोडी, बेळगाव आणि धारवाड भागात गांजा विक्री करत असल्याची माहिती दिली आहे. या आठवड्यात करण्यात आलेल्या गंजविरोधी कारवाईत हि सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक आहे.