कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या हे संवेदनशील शहर आहे.
अनेक साहित्यिक उपक्रम येथे वरचेवर राबविण्यात येतात. बैठका पार पडतात. साहित्यविषयक उपक्रमांवर चर्चा होतात. पुस्तके प्रकाशित केली जातात. कविता वाचनासारखे उपक्रम राबविले जातात. पण सद्यस्थितीत सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर करणे अशा स्वरूपामुळे व कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे एकंदर साहित्यिकां विश्वाची परिस्थिती ठप्प झाली होती.
पण अशा कठीण परिस्थितीतही बेळगावच्या साहित्य क्षेत्राने आपला ठसा कायम ठेवण्यासाठी वेबनारसारख्या व इतरअनेक सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्यासपीठाचा वापर करून अनेक साहित्यिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगावमधील अनेक साहित्यिक या उपक्रमात सहभागी होतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून साहित्य विश्व अधिक सजग होत आहे. याआधी होत असलेल्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे प्रत्येकाला शक्य नव्हतं. परंतु या नवीन व्यासपीठामुळे अनेक साहित्यिक या माध्यमातून एकत्र येऊ लागले. लॉकडाऊनच्या काळातही कार्यक्रम पार पाडू लागले.
‘बुक लव्हर्स क्लब’ सारख्या संस्थांनी 5 दिवसांचा कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणचे अनेक दिग्गज साहित्यिक यात सहभागी झाले, त्यांनी आपली मतं व्यक्त केली. निबंध, कथा, कविता वाचनासारखे कार्यक्रम, स्पर्धाही आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर होऊ लागल्या आहेत. बेळगावचे साहित्यिक या नवीन संकल्पनेत खूप छान रित्या जोडले गेले. या माध्यमातून अनेक ठिकाणचे साहित्यिक जोडले गेले.
गेल्या काही महिन्यांपासून कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेले ऑनलाइन माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमांमुळे, उपक्रमांमुळे साहित्यिक विश्वाला तरून घेऊन गेले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यामुळे साहित्य विश्व पुन्हा पुढे गेले आहे.
कोरोनाचे संकट तूर्तास तरी 30 ते 40 टक्केच पूर्ण झाल्याचे वृत्त आहे, कोरोनावरील लस येईपर्यंत तरी नागरिक मुक्तपणे बाहेर पडतील अशी चिन्हे दिसत नाहीत. येत्या काळात ऑनलाइन माध्यमासारख्या गोष्टींमुळे साहित्याचा साहित्यविश्वात साकल्याने विचार होईल असे वाटते .
साहित्य विश्वात प्रत्यक्ष आणि थेट कार्यक्रम जरी झाले नाहीत तरी कोरोनाच्या या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून बेळगावच्या साहित्य विश्वाला नवी उभारी मिळाली, असे वाटत आहे. पुरोगामी विचार मंच, मंथन, बागेतल्या कविता अशा अनेक संस्था या उपक्रमात हिरिरीने भाग घेऊन साहित्यविश्वात कार्य करत आहेत ही समाधानाची बाब आहे.