Thursday, December 26, 2024

/

डीसीसी बँक निवडणुकीची तारीख जाहीर

 belgaum

कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आलेली बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. हि निवडणूक आता ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यात राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. निवडणुकांचे बिगुल वाजले त्यावेळेपासूनच राजकीय मोर्चेबांधणीला ऊत आला होता. ७ ऑगस्ट रोजी ही निवडणूक घेण्यात येणार होती. तसेच आतापर्यंत हीं निवडणूक तीन वेळा पुढे ढकलण्यातही आली होती.

अनेक दिग्गज राजकारण्यांनी या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक हेवे-दावे केले होते. निवडणुकीसाठी अनेक पार्ट्या रंगल्याचीही चर्चा सुरु होती. मोर्चेबांधणीही दमदार झाली होती. अनेक पत्रकार परिषदेतून या बँकेवर आपलाच विजय होईल,अशी अनेकांनी प्रतिज्ञाही बोलून दाखविली होती. मात्र कोरोनामुळे हि निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि निवडणुकीसाठी हेवे-दावे करून फुगवण्यात आलेला फुगा तूर्तास मावळला होता.

या निवडणुकीच्या शर्यतीत डीसीसी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती हे पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयारीला लागले आहेत. रमेश कत्ती यांना त्यांचे बंधू उमेश कत्ती, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार शांता गौडर आणि माजी आमदार अरविंद पाटील आपले वर्चस्व गाजविण्यासाठी सिद्ध झाले आहेत. यासोबतच भाजपच्या दोन गटात या निवडणुकीत जोरदार चुरस बघायला मिळणार आहे.

या निवडणुकीचा परिणाम राज्य सरकारवर होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. आरएसएसच्या नेत्यांनी या दोन्ही गटांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. परंतु हे दोन्ही गट एकत्रित येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. या निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे देखील या निवडणुकीच्या शर्यतीत आहेत.

आता निवडणुकीची तारीख पुन्हा एकदा जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार काडाच्या उपप्रशासकीय अधिकारी जयश्री शिंत्रे यांची नेमणूक करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सहकार खात्याकडून बीम्सच्या प्रशासकीय अधिकारी अधिकारी सईदा अफ्रिनबानू बळ्ळारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्तांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी तयार केली जात असून डीसीसी बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहकारी संघांना माहिती पुरविण्याचे आवाहन बँकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.