जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोविडने भारतातही चांगलेच थैमान घातले आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात सर्वात जास्त कोविड रुग्ण आढळून येणाऱ्या शहरांच्या यादीत बेळगावचाही समावेश आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे मत पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
कोविड चाचण्यांची संख्या जसजशी वाढत आहे तसतशी बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे त्याचप्रमाणे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, कोविड ही जगात धुमाकूळ घालणारी महामारी आहे. जगाच्या तुलनेत भारतात रुग्णसंख्या कमी आहे.
कर्नाटकात विशेषतः बेळगावमध्ये जास्त चाचण्या केल्या जात असल्याने बाधित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत आहे त्यासोबत अनेक रुग्ण कोरोनमुक्तही होत आहेत . जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी संसर्ग नियंत्रणासाठी कठोर परिश्रम घेत आहेत .
खाजगी रुग्णालयांमध्ये उर्वरित रुग्णांवर उपचार करण्याच्या व्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.