बेळगावमधील सरकारी वैद्यकीय अधिकारी संघाच्या डॉक्टरांनी आज प्रतिकात्मक आंदोलन छेडून आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. पगारवाढ हा मूळ मुद्दा आणि यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा पंचायत सीईओंकडे निवेदन सुपूर्द केले. यामार्फत सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंतचा अवधी दिला आहे.
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारी वैद्यकीय अधिकारी संघाच्या डॉक्टर्सनी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत सरकारला दिली होती. परंतु सरकारने यावर कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे याचा विरोध करत आज डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. आणि याची दाद मागण्यासाठी जिल्हा पंचायत सीईओंमार्फत आज सरकारला निवेदन सोपविले.
आरोग्य विभागाच्या अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा अहवाल १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरपर्यंत देणे स्थगित केले जाईल, आणि सरकारकडून कोणतेच पाऊल उचलण्यात न आल्यास २१ सप्टेंबरपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा स्थगित केल्या जातील. त्यांनतर २१ सप्टेंबरला राज्यातील सर्व ३१ तुकड्यांचा “चलो बंगळूर” उपक्रम हाती घेण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सरकारने आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपेक्षा केली आहे. कोरोना काळात कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता रोगप्रतिबंधक उपाययोजनांसह उपचार करण्यापर्यंत सर्व गोष्टींवर सातत्याने कार्यरत आहेत. परंतु सरकारकडून याची दाखल घेतली जात नाही, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. यासाठी आम्ही २१ तारखेला आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी “चलो बंगळूर” कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ . संजय डुंमगोळ यांनी दिली.
राज्य सरकारी वैद्यकीय अधिकारी संघाचे उपाध्यक्ष म्हणाले कि, सरकारने डॉक्टरांकडे दुर्लक्ष केले आहे . आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा देणे अपरिहार्य आहे . २१ तारखेला राज्यातील सर्व जिल्ह्यातील ३ हजाराहून अधिक डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार आहेत .
हे निवेदन सादर करताना राज्य शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हा शाखेचे अधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते .