दररोज पुढे येणाऱ्या स्मार्ट सिटी कामकाजाबाबत आज पुन्हा एक नवी तक्रार आली आहे. आज अनगोळ येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून येथील समस्या सोडविण्यासाठी अर्ज केला आहे.
याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये ड्रेनेज लाईन बदलून देण्यात यावी, यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीचे शशिधर कुरेर यांच्याशी संपर्क साधला असता अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी चौक, अनगोळ येथे दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईन घालण्यात येईल, असे सांगण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरनी सांगितल्याप्रमाणे हरी मंदिरच्या समोर ही ड्रेनेज लाईन घालण्याची गरज असताना हरी मंदिराच्या विरुद्ध दिशेला हि ड्रेनेज लाईन घालण्यात आली आहे. आणि दोन दिवसांपूर्वी येथे काँक्रिटीकरणाचे कामही सुरू करण्यात आले आहे, जे प्लॅनिंगच्या विरोधात आहे.
कॉन्ट्रॅक्टर स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काम करत नाहीत. संपूर्णपणे जलवाहिनी, भूमिगत विद्युत आणि दूरध्वनी केबल, गॅस पाईपलाईन हे सर्व कामकाज पूर्ण होण्यापूर्वीच प्लॅनिंगच्या उलट दिशेने काम करून आधीच काँक्रीट घालण्यात येत आहे. याबाबतीत स्तहनिकानी अनेकवेळा तक्रारी केल्या असून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईन घालण्याचे ठरले असूनही केवळ एकाच बाजूने ड्रेनेज लाईन घालण्यात आलेली आहे. यासाठी १०.०७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. हे काम अशाच अर्धवट स्थितीत करण्यात आले तर भविष्यात येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. शिवाय जनतेच्या पैशाची उधळपट्टी होईल.
बेळगाव शहरात होत असलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाच्या दर्जाबद्दल, कामाच्या पद्धतीबद्दल तक्रारी पुढे येतच आहेत. अनगोळ येथे उद्भवलेल्या या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियरवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अनगोळ येथील नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.