अनेक ठिकाणी खाजगी शाळा सुरु होत असून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे अनेक अंगणवाड्या बंद पडत आहेत. या अंगणवाड्या वाचवण्यासाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तसेच अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशन, एआयटीयूसीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले. यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले.
अंगणवाडी केंद्रात एल.केजी./यु.केजी. वर्गाला सुरुवात करावी, आयसीडीएस योजना वाचवाव्यात, अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबद्दल प्रशिक्षण मिळावे, मुलांना पाठपुस्तक, गणवेश मिळावेत, तसेच प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी अंगणवाडीतून दाखला देण्याचे प्रयोजन करावे, बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना आणि सहाय्यकांना २०१९ पासून गौरवधन देण्यात आले नाही. तव त्वरित देण्यात यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी कार्यकर्त्या ज्यापद्धतीने काम करतात त्या तुलनेत त्यांना योग्य वेतन मिळत नसून खाजगी शाळांकडे पालकांचा कल असल्यामुळे सरकारच्यावतीने अनेक अंगणवाड्या बंद करण्यात येत आहेत. याला अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विरोध आहे. सरकारने अंगणवाडीत एलकेजी, युकेजी वर्ग सुरु करावेत, यासाठी आपण आंदोलन करत असल्याची माहिती अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिली.
या आंदोलनात फेडरेशन अध्यक्ष नागेश सातेरी, जिल्हा उपाध्यक्ष वाय. बी. शीगीहळ्ळी, मीनाक्षी कोटगी, अंगणवाडी कार्यकर्त्या, सहाय्यिकांनी सहभाग घेतला होता.