सध्या अनेक लहान मुले आणि युवक पतंग उडवताना दिसून येत आहेत. मागील आठवड्यात पतंगाचा मांजा बनविणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु याचा फारसा फरक पडला आहे, असे जाणवत नाही.
आज पुन्हा कपिलेश्वर उड्डाण पुलाजवळ मांजा गळ्यात अडकून एक युवक जखमी झाला आहे. या युवकाच्या गळ्याला दुखापत झाली असून गळा चिरण्यापासून सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. ओमकार पाटील, राहणार : येळ्ळूर असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
गांधीनगर येथून मार्गक्रमण करणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात असाच मांजा अडकून तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याने पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. याची दखल घेत पोलिसांनी मांजा तयार करणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी घालून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु शहर परिसरात या सूचनेचा कोणताच फायदा झाल्याचे दिसून येत नाही.
हा मांजा तयार करण्यासाठी काचेच्या भुकटीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मांजा धारदार असतो. सहजपणे कोणाच्याहि त्वचेला चीर पडू शकेल इतकी धार या मांजात असते.
त्यामुळे अशा धोकादायक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणे आणि इतरांच्या जीवाशी न खेळणे हा एकाच पर्याय यावर असू शकतो. समस्त पालक वर्ग आणि युवकांनी देखील या धोकादायक मांजाचा वापर होण्यापासून रोखावे. अन्यथा पतंगाच्या खेळामुळे निष्पाप लोकांचा जीवावर बेतू शकेल.