मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर पासून हे पासपोर्ट सेवाकेंद्र मुख्य पोस्ट कार्यालय आवाराच्या नव्या जागेत पुन्हा सुरु करण्यात आले आहे. बेळगाव येथील नागरिकांना हुबळी येथे जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. बेळगावमध्येही पासपोर्ट सेवा सुरु करावी अशी मागणी वारंवार केली जात होती. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन हे पासपोर्ट केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
बेळगावमधील कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात हे सेवा केंद्र सुरु करण्यात आले होते. या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे बेळगावकरांना पासपोर्ट काढणे सहज शक्य झाले होते. परंतु मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले कार्यालय हे नागरिकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू झाले आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील जागा अत्यंत कमी असल्यामुळे सामाजिक अंतर पाळणे शक्य नसल्यामुळे पासपोर्ट मंत्रालयाकडून परवानगी मिळण्यास वेळ लागत होता. याला पर्याय म्हणून सामाजिक अंतर राखण्यासाठी दररोज केवळ २५ जणांना प्रवेश देण्याच्या नियमासह हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
पोस्ट कार्यालयाच्या मदतीने राज्यात एकूण २२ ठिकाणी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. राज्यात इतर ठिकाणची पासपोर्ट केंद्रे कधीच सुरु करण्यात आली असून केवळ बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र बंद का ठेवण्यात आले आहे, याबाबतीत नागरिकांची विचारणा सुरु होती. बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे सोमवारपासून हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती पोस्ट कार्यालयाचे अधीक्षक एस. डी. कुलकर्णी यांनी दिली. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा हे कार्यालय कार्यरत झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.