हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने देखील याबाबत जिल्हाधिकारी याना भेटून निवेदन देण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे पुस्तकातून महाराजांचा इतिहास गायब, आता तर चक्क महाराजांची मूर्ती गायब असे दोन्ही विषय या निवेदनात असणार आहेत .
हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे प्रतिष्ठापित छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कर्नाटक प्रशासनाने काही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येत रातोरात हटवली आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध देखील करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, पुस्तकातून महाराजांचा इतिहास काढून टाकणें, आणि मूर्ती हटवणे असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत, प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबाबत झालेला अवमान शिवभक्त सहन करू शकत नाहीत असेही युवा समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
येत्या सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे