हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र दोन दिवसांपूर्वी हरवले होते.
वडगाव चे बांधकाम व्यावसायिक अनंत पाटील हे आपल्या पत्नी रोहिणी यांच्यासमवेत फिरावयास गेले असताना गोमटेश विद्यापीठ जवळ रस्त्यावर त्यांना एक दागिना सापडला त्यांनी आजुबाजूला कोण शोधते काय ते पाहिले पण कोणीच दिसले नाही त्यामुळे त्यांनी तेथील काही दुकानदारांना याची कल्पना दिली आणि कोणीही आपला दागिना हरवलाय अशी तक्रार करत आले तर आम्हाला संपर्क साधा असे म्हणून आपला मोबाईल नंबर दिला. ही घटना बुधवारची.
गुरुवारी एका महिलेने त्या भागात शोधले असता तिला पाटील कुटुंबियांचा नंबर मिळाला आणि तिने ‘माझे मंगळसूत्र हरवले आहे ते तुम्हाला मिळाले असल्यास परत द्यावे’ अशी विनंती केली.

तुम्ही उद्या येऊन तुमच्या हरवलेल्या वस्तूची खात्री करून द्या असे पाटील यांनी सांगितल्यानुसार शुक्रवारी सौ सौम्या बुदिहाळ या आपले पती जे फलोत्पादन खात्यात कार्यरत आहेत त्यांना व वडील विनय छत्रिय याना घेऊन पाटील यांच्या घरी आले व त्यांनी आपल्या हरवलेल्या मंगळसूत्राचा फोटो दाखवला. तो फोटो पाहताच ते त्यांचेच मंगळसूत्र आहे याची खात्री झाल्यानंतर पाटील यांनी ते मंगळसूत्र बुधियाळ यांना सुपूर्द केले.
हरवलेले सुमारे दोन तोळ्याचे मंगळसूत्र परत मिळताच बुदिहाळ यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही त्यानी पाटील कुटुंबियांचे पाय धरले आणि मंगळसूत्र परत नेले
याप्रसंगी अनंतराव पाटील यांचे बंधू गजानन पाटील तसेच वसंतराव नाईक व इतर मित्र परिवार उपस्थित होते