स्वराज्य निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागलेला संघर्ष हा अविस्मरणीय आहे. त्यांचे आचार, विचार, तत्त्वे आणि त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा, असे वक्तव्य हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी केले. कणगला येथील अश्वारूढ शिवपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कणगला येथे लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी या पुतळ्याची उभारणी केली आहे. हीबाब प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जोतिबा पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
या कार्यक्रमाला निपाणीचे श्रीमंत दादाराजे देसाई सरकार उपस्थित होते. ते म्हणाले कि, शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. ४०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही तशीच जिवंत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीची आज समाजाला गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ही मूर्ती कोल्हापूर येथील मूर्तिकार संजय संकपाळ यांनी साकारली असून या मूर्तीची उंची ८ फूट इतकी आहे. सुमारे १ टॅन इतके वजन असलेली ही मूर्ती ब्रॉन्झ धातूपासून बनविण्यात आली आहे.
या अनावरण समारंभाप्रसंगी तहसीलदार, अशोक गुरांची, पीएसआय गणपती कोगनोळी, संगम कारखाना चेअरमन राजेंद्र पाटील, जि. पं. सदस्य महेश कुंभार, श्रीराम सेने हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, शशिराजे पाटील, श्रीकांत हतनुरे यांच्यासह अनेक मान्यवर, शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासो पुजारी यांनी केले तर आभार मारुती वाळके यांनी मानले.