“रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाऊंडेशनच्या मान्यतेने रोटरी क्लब बेळगावच्यावतीने शहरातील बीम्स व सिव्हील हॉस्पिटलला 80 लाख रुपये खर्चून 6 व्हेंटिलेटर्स व रॅपीड मल्टिपल डिसीज टेस्टिंग मशीन देणगी दाखल देण्यात आले आहे.
सध्याची कोरोना संकटकालीन परिस्थिती लक्षात घेऊन सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने बीम्स / सिव्हील हॉस्पिटलला 6 व्हेंटिलेटर्ससह विविध आजारांची जलद तपासणी करणारे अद्यावत मशीन देणगीदाखल देण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे माजी अध्यक्ष शरद पै यांच्या नेतृत्वाखाली रोटरी – बीम्स लाईफ सपोर्ट प्रोग्रामअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 80 लाख रुपये खर्चाचे स्वित्झर्लंड येथे नवजात शिशूच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेले टाॅप ऑफ लाइन हॅमिल्टन व्हेंटिलेटर्स तसेच एका तासामध्ये कोरोनासह विविध रोगांसंदर्भातील तपासण्या करू शकणारे रॅपिड मल्टिपल डिसीज टेस्टिंग मशीन बिम्सला देण्यात आले आहे. बिम्स येथे कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी गेल्या 6 ऑगस्टपासून हे मशीन कार्यरत झाले आहे.
सदर प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावने 45 लाख रुपये जमा केले असून बेळगावच्या पाॅलिहायड्रोन फाऊंडेशनने 20 लाख रू., अशोक आयर्न वर्क्सच्या जय भारत फाऊंडेशनने 10 लाख, डायमंड मेटल स्क्रीन्स, स्नेहम फौंडेशन, बीटीपी इन्फो या कंपन्यांनी 5 लाख रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे रोटरी फाउंडेशनने ग्लोबल ग्रँट अंतर्गत 35 लाख रुपये देऊ केले आहेत.
रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश मसुरकर, डॉ. प्राणेश जागीदार व माजी अध्यक्ष जीवन खटाव, सचीव प्रमोद अगरवाल यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. तसेच हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात समन्वयक अक्षय कुलकर्णी यांचा सिंहाचा वाटा आहे. बिम्सला व्हेंटीलेटर्स आणि रॅपिड मल्टिपल डिसीज टेस्टिंग मशीन देतेवेळी अक्षय कुलकर्णी यांच्यासह रोटरी फाउंडेशनचे चेअरमन सचिन सबनीस, पराग भंडारे, योगेश कुलकर्णी, संतोष पाटील, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष डाॅ. के. एम. केळुसकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या पद्धतीने बीम्स व सिव्हील हॉस्पिटलला सहकार्य करण्याचा रोटरीचा उपक्रम चार वर्षे चालणार आहे.