मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्वरित बसवावा या मागणीसाठी कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी कवळीकट्टी गावापासून कर्नाटक सीमेपर्यंत दांडी मार्च काढला.तेथे हुक्केरीच्या तहसीलदारांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्वरित बसवण्याची मागणी केली.
यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.पंधरा दिवस उलटले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास कर्नाटक सरकार चालढकल का करत आहे असा सवाल केला.त्यावेळी शिवाजी महाराजांसह अन्य पुतळे लगेच बसविण्यात येतील असे आश्वासन हुक्केरी तहसीलदारांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोर्चा काढला होता. तहसीलदार यांनी सीमेवर निवेदनाचा स्वीकार केला.
पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवतो म्हणून अद्याप बसवली गेली नाही हा शिवरायांचा अपमान आहे कर्नाटक सरकारने फसवलं आहे म्हणून आम्ही लॉंग मार्च काढला मुळात शिवरायांच्या साठी आंदोलन करायला लावणं हे योग्य नाही सन्मानाने पुतळा बसला पाहिजे अशी सेनेची भूमिका आहे असे विजय देवणे यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्वरित बसवावा मागणीसाठी दांडी यात्रा काढणार असल्याने कर्नाटक पोलिसांनी मणगुत्ती गावाच्या प्रवेशद्वारावर मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मणगुत्ती गावात जाणाऱ्यांची चौकशी करून सोडले जात आहे.महाराष्ट्र पासिंगची वाहने पोलीस अडवत होते. त्यांना पुढे सोडले जात नव्हते.
शिवसेना कवळेकट्टी ते मणगुत्ती दांडी मार्च काढणार असल्याने कवळेकट्टी येथेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गावातील व्यक्ती सोडून अन्य व्यक्तींना गावात जाण्यास परवानगी दिली जात नव्हती.