खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील म्हादाई नदीवर बांधलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिणामी खानापूरच्या घनदाट जंगलातील गवळीवाडा, कोंगला, पास्तोळी, गवाळी आदी गावांचा शहराशी असणारा संपर्क तुटला आहे.
गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे म्हादाई नदीला पूर येऊन या नदीवरील संबंधित लोखंडी पुलाची पार दुर्दशा झाली आहे. पुरामुळे घनदाट जंगलातील गवळीवाडा, कोंगला, पास्तोळी, गवाळी आदी गावांना बेटांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सदर गावांसाठी वीज पुरवठ्यासह वाहतुकीची व्यवस्था नसल्यामुळे तसेच मोबाईल संपर्क नसल्यामुळे या गावांचा शहराची असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात गवाळी आणि परिसरातील गावांचा या पद्धतीने शहराशी असणारा संपर्क तुटत असतो.
खानापूर तालुक्यातील नेरसा गावानजीकच्या अत्यंत दुर्गम वनक्षेत्रात ही गांवे असल्यामुळे या गावांपर्यंत पोहोचायचे असेल तर भांडुरा आणि म्हादाई नदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यातील गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी संबंधित गावातील ग्रामस्थ श्रमदानाने भांडुरा नदीवर तात्पुरता पूल उभारत असतात. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक नासिर बागवान यांनी म्हादई नदीवर कायम स्वरूपी लोखंडी ब्रिज बांधून दिला आहे.
गेल्या चार वर्षापासून ग्रामस्थ या लोखंडी पुलाचा वापर करत होते. या पुलावरून दुचाकी वाहने जाऊ शकत असल्यामुळे गवाळी आणि परिसरातील गावांचा पावसाळ्यात देखील खानापूर गावाशी संपर्क असायचा. मात्र गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा लोखंडी पूल पूर्णपणे वाहून गेला आहे. सदर पुर गेली चार वर्षे भक्कम स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांनी म्हादई नदी ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती.
परिणामी यंदा लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे गवाळी पास्तोळी आणि कोंगला ही गावे नदीच्या पैलतीरावर पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत. सदर गावांचा शहरी भागाशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला असून सध्या तातडीची वैद्यकीय मदत देखील या गावांपर्यंत पोचू शकत नाही. वनखाते परवानगी देण्यास तयार नसल्यामुळे तालुका प्रशासनाने दुर्देवाने आजतागायत घनदाट जंगलातील भांडुरा व महागाई नदीवर भक्कम पूल बांधलेला नाही.