बेळगाव परिसरात पावसाची संततधार सुरूच असून शहरात अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. स्मार्टसिटीच्या नावाखाली काँक्रीटीकरण करण्यात आलेला काँग्रेस रोड जलमय झाला आहे.
एन एच 4 अ बेळगाव बेळगाव पणजी हा राष्ट्रीय महामार्ग पिरनवाडी जवळ जलमय बनला होता जैतूनमाळ डोंगर परिसरसातून येणाऱ्या पाण्यामुळे, बेंमको आणि ब्रह्मनगर जवळील नाले रस्त्याच्या कामात बंद झाल्याने पिरनवाडी मारुती नगर जलमय बनला होता खानापूर रोडवर पाणी आले होते त्याच पद्धतीने सोमवारी सकाळो काँग्रेस रोड वर देखील पाणी आले होते त्यामुळे रस्ता आहे की तलाव अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मिलिट्री महादेव मंदिर ते अरुण चित्रपटगृह या रस्त्यावरून सध्या वाहने हकण्यासारखी परिस्थिती नसून बोटीने प्रवास करावा का? असे चित्र दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्याऐवजी नवीन स्विमिंग पूल निर्माण केला काय? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. पाण्यातून वाट काढण्याचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागत आहे.
काही वर्षांपासून या भागात पावसाळ्यात हे नेहमीचेच झाले आहे. पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणे याच कारणामुळे काँग्रेस रोडवर पाण्याचे जलाशय निर्माण होत आहे. या भागातील अनेक नाल्यांचे शहरीकरणाच्या नावाखाली अस्तित्व नाहीसे झाले. तर सध्याच्या नाल्यावरही अतिक्रमण झाल्याने पात्र आकुंचन पावले आहे. त्यामुळेच हा प्रकार वारंवार घडतो आहे. जक्कीनहोंडा परिसरातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने काँग्रेस रोड भागात फुगवटा निर्माण होत आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ कडून पत्राचे रुंदीकरण करणे तसेच नाल्यांवर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेणे हाच यावरचा उपाय आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे गतवर्षी च्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.