पिरनवाडी येथील पुतळा वादानंतर काही कन्नड संघटनांच्या फेसबुक पेजवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर सर्वत्र संताप व्यक्त होत असून, शिवरायांबद्दल अवमानकारक पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध संघटनांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. शिवाय हा प्रकार निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण हिंदू म्हणून मानाने जगात असून काही कानडी लोकांच्या विकृत मनोवृत्तीमुळे बेळगावच्या शांततेला तडा जाण्याचा प्रकार होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायन्ना हे दोन्ही वीरपुरुष आहेत. यांची एकमेकांशी तुलना करू जाणूनबुजून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, आणि राष्ट्र पुरुषाचा अपमान करण्यासाठी खतपाणी घालणाऱ्या लोकप्रतिनिधीनी वेळीच हा प्रकार आवरावा. अन्यथा हिंदू संघटना याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी तयार आहेत. आम्ही यापुढे राष्ट्र पुरुषाचा अपमान सहन करणार नाही असे प्रकार यापुढे घडल्यास सरकारने किंवा पोलिस प्रशासनाने स्वतः गुन्हे दाखल करावेत, कुठल्याही तक्रारदाराची वाट पाहू नये, अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कारवाई करण्यास समर्थ आहे असा इशारा उपस्थित हिंदू संघटनांच्या नेत्यांनी दिला.
अनेक ठिकाणी देशभक्तांच्या अपमान करण्याचे कात कारस्थान रचण्यात येत असून छत्रपती शिवरायांवर अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या धेंडांना चपलांचा हार घालून धिंड काढायला हवी, आणि या दोषींवर कडक कारवाई करावी असे मत हिंदूराष्ट्र सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बाळू कुरबुर यांनी व्यक्त केले.
या सर्व मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.