नदीचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जर नदी नष्ट झाल्या तर पुढे मोठा धोका उद्भवतो. त्यामुळे नदीचे पावित्र्य राखणे सध्या काळाची गरज बनली आहे. मात्र काही महाभाग पूजा अर्चा केलेले निर्माल्य नदीत फेकून देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मार्कंडेय नदीचे पावित्र्य यापूर्वी धोक्यात आले होते.
आता निर्माल्य टाकूनही नदीचे पावित्र्य धोक्यात आणत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकाराने संताप व्यक्त करण्यात येत आहे. निर्माल्य टाकल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे.
मार्कंडेय नदीकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्याचा घटना घडत असतानाच आता निर्माल्य नदीत टाकून पाणी दूषित करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कंग्राळी खुर्द येथील नदीकाठ परिसरात कचरा फेकून तो उचल करण्याकडे दुर्लक्ष होत असतानाच आता आंबेवाडी येथेही नदीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
या प्रकारावर रोख लावण्याची गरज निर्माण झाली आहे तर सामाजिक भान ठेवत नागरिकांनीही निर्माल्य एका बाजूला ठेवणे गरजेचे बनले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.