ग्रामपंचायतीचा विकास व्हायचा असेल तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कारभार व्यवस्थित व सुरळीत चालवण्यासाठी आणि नागरिकांची मिळते जुळते करून घेऊनच विकासाला प्राधान्य देण्याची गरज असते. मात्र काही ग्रामविकास अधिकारी नागरिकांकडून पैसे उकळून स्वतःचे झोळी भरून घेण्यात धन्यता मानत आहेत. तालुक्यातील अनेक ग्राम विकास अधिकारी भ्रष्टाचाराच्या विळख्यात बरबटत चालले आहेत. त्यामुळे विकासाऐवजी भ्रष्टाचारच अधिक होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत.
बाळेकुंद्री खुर्द त्यानंतर बेकिनकेरे आणि आता कलखांब येथे सेवा बजावत असणाऱ्या ग्राम विकास अधिकारी श्रीशैल नागठाण यांचे कारनामे वारंवार ऐकावयास मिळत होते. आता पाच हजाराची लाच स्वीकारताना हे प्रकरण त्यांच्या चांगले अंगलट आले आहे. या आधीही त्यांनी अशा बऱ्याच प्रकारे करामती केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराजी होती. आता कलखांब येथे सेवा बजावत असताना त्यांनी लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मागील पंधरा दिवसात दोघा पिडिओवर निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार सुधारणार कधी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना असली तरी काही जिल्हा पंचायतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते मालेदा खाण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला माखलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना थारा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रथम कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मात्र साऱ्यांचे हात दगडाखाली असल्याचा आव आणत स्वतःही भ्रष्टाचारात बरोबरीचे भागीदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना शहाणपणा कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे एकंदरीत तालुक्याच्या ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आणि ग्रामविकास अधिकार्यांच्या मनमानी कारभारावर चाप कोण आणणार अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.
बेळगाव तालुक्यात एका ग्रामविकास अधिकाऱ्यांना दोन ते तीन ग्रामपंचायती देण्यात आले असले तरी भ्रष्टाचारामुळे अनेक ग्रामपंचायतमध्ये विकास थांबला आहे. मात्र याचे सोयर-सुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.