बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कोरोनावर मात केली आहे. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये उपचारांती पूर्णपणे बऱ्या झालेल्या आमदार बेनके यांना आज सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांना गेल्या 13 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी संशयावरून त्यांनी स्वतःला होम काॅरंटाईन करून घेतले होते. त्यावेळी कोरोनाला घाबरून जाऊ नका असे जनतेला आवाहन करणाऱ्या आमदार बेनके यांनी आपण निश्चितपणे कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे होऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला होता.
त्यानंतर केएलई हॉस्पिटलच्या कोविड सेंटरद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. आता 20 दिवसांच्या उपचारांती ते कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तथापि विशेष खबरदारी म्हणून आणखी 7 दिवस आमदार आपल्या घरीच होम काॅरंटाईन होणार आहेत.
दरम्यान, आपण कोरोनावर निश्चितपणे मात करू असा आत्मविश्वास व्यक्त करून त्याप्रमाणे कोरोनावर मात केलेल्या आमदार बेनके यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगसह कोरोनासंदर्भातील अन्य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.