नियोजन शून्य अंमलबजावणी आणि समन्वयाचा अभाव यामुळे स्मार्ट सिटी योजना बेळगाव संपूर्णता अयशस्वी झाल्याचे स्पष्ट मत शहरातील ख्यातनाम शिक्षण तज्ञ डॉ. अनिल कालकुंद्रीकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव स्मार्ट सिटी योजना आणि सध्या या योजनेमुळे झालेली शहराची वाताहात यासंदर्भात “बेळगावला लाईव्ह”शी विषयी बोलताना डॉ. कालकुंद्रीकर यांनी व्यक्त उपरोक्त मत व्यक्त केले. आपले मत व्यक्त करताना स्मार्ट सिटीची संकल्पना अतिशय उत्तम आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योजनाबद्धरीतीने केली पाहिजे. बेळगांवात त्याची अंमलबजावणी नियोजन शून्य पद्धतीने केली जात आहे.
विविध खात्यात समन्वयाचा अभाव आहे. एकाच वेळी सर्व प्रभागात कामे सुरू केली जात आहेत. खड्डे खणले जात आहेत, वाहतुकीची कोंडी होत आहे, पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. या सर्व गोष्टींमुळे अपघाताला निमंत्रण देणारी स्थिती निर्माण झाली आहे. याखेरीज आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे असे डॉ. कालकुंद्रीकर यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजना यशस्वी करण्यासाठी सर्व खात्यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. मात्र गेली दोन-तीन वर्षे सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या कामांतर्गत सावळा गोंधळ सुरू आहे. या गोंधळामुळे अनेक कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता लोकांना स्मार्ट सिटीच्या संकल्पनेपेक्षा पूर्वीचेच बेळगाव अधिक सुंदर वाटत आहे. याला कारण स्मार्ट सिटी संकल्पना चांगली असून देखील तिचा योग्य उपयोग आपल्याला करता येत नाही हे आहे असे स्पष्ट करून लोकांनी किती दिवस यातना सहन करायच्या असा सवाल त्यांनी केला.
सध्या परिस्थितीत शहरातील 90 टक्के लोक स्मार्ट सिटी विकास कामाच्या बाबतीत समाधानी आहेत. फक्त चांगले दिवे लावल्यामुळे शहर स्मार्ट होत नाही. शहर स्मार्ट करण्यासाठी योग्य सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. नेहमी पिण्याचे पाणी चांगले रस्ते आधी मूलभूत नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने पुरवण्याचे काम स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होणे आवश्यक आहे. बेळगांव शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने एक समन्वय समिती स्थापन करून सर्व खात्यांचा समन्वय घडवून आणणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या समन्वयातून ठराविक वेळेत ठराविक प्रभागातील विकास कामे ताबडतोब पूर्ण करण्यात आली पाहिजेत. मात्र दुर्दैवाने बेळगावात नियोजन शून्य अंमलबजावणी आणि समन्वयाच्या अभावामुळे यापैकी काहीही घडत नाही आहे असे डॉ. अनिल कालकुंद्रीकर यांनी शेवटी स्पष्ट केले.