शुक्रवार दि. २८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पुतळा वादावरून आजपर्यंत तणावपूर्ण वातावरण असून शुक्रवारी सायंकाळी एडीजीपी अमरकुमार पांडे यांनी शांतता सभा घेऊन वातावरण निवळले होते. परंतु त्यानंतर काही मूठभर मराठीद्वेष्ट्या कन्नडिगांना पोटशूळ झाला असून सोशल मीडिया आणि आज पुन्हा करवेच्या नारायण गौडाने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. यामुळे शांत बेळगावला पुन्हा तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर क्रांतिवीर संगोळी रायण्णांचा पुतळा रातोरात बसविण्यात आला होता. त्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरु होऊन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पर्यायाने संपूर्ण शहर, तालुका आणि कर्नाटकासह महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. दोन्ही समाजाच्या नेत्यांच्या बैठकीतून याविषयी तोडगा काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर फेसबुकवर कन्नड अभिमानी व्यक्तीने शिवरायांवर अवमानकारक पोस्ट टाकली. यावरून पुन्हा वातावरण पेटले आहे. अशातच कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडाने या वादाला पुन्हा आगीच्या स्थानी नेऊन ठेवले आहे.
बेळगाव हे कोणाच्या मालकीचे नसून यावर कर्नाटकचे राज्य आहे. कोणती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोणते शिवसैनिक? जिथे संगोळी रायणांचा पुतळा आहे त्या चौकाला शिवाजी चौक असे नाव का? त्या चौकाला संगोळी रायणांचे नाव द्या! जिल्हा प्रशासनाने यावर का माघार घेतली याचे उत्तर आपल्याला मिळायला हवे.
आपल्यावर अनेक केसीस दाखल आहेत आणि आम्ही अशा केसीस ना घाबरत नाही. जशा केस दाखल झाल्या तशाच त्या काढूनही घेण्यात आल्या आहेत. अजूनही शेकडो केसीस दाखल झाल्या तरी चालतील पण घाबरण्याचे काही कारण नाही. बेळगावमध्ये २०-२५ वर्षे कन्नडिगांची सत्ता आहे आणि राहील. कर्नाटकात कोणीही आमच्यावर दडपण घालण्याचे कारण नाही, दडपण घालायचे असेल तर महाराष्ट्रात घाला. हे कर्नाटक आहे, येथे कोणाचीही मालकी खपवून घेतली जाणार नाही अशाप्रकारचे संतापजनक वक्तव्य नारायण गौडा याने केले आहे.
ज्यापद्धतीने नारायण गौडाने हे बेताल वक्तव्य केले आहे, त्यावरून यामागे नक्कीच कोणते तरी दुसरे राजकारण सुरु असल्याचा वास येतो आहे. बेळगाव हे कोणाच्या मालकीचे नसून येथे गेली ७० वर्षे येथे मराठी भाषिक राहतात. मराठी भाषिकांवर झालेला अन्याय, अत्याचार हा सर्वाना परिचित आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करणाऱ्या नारायण गौडाने आपली पात्रता ओळखून बोलावे. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा क्रांतिवीर संगोळी रायन्ना, हे दोन्ही राष्ट्रपुरुष कोणत्या तत्वानिशी राहिले याचा आदर्श घेऊन अशा महाभागांनी बोलावे. एखाद्या संघटनेचे नेतृत्व करणे म्हणजे वाट्टेल ते बोलणे असे, नव्हे. केवळ प्रसिद्धीपोटी अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या महाभागांना पोलीस आणि प्रशासन पाठीशी का घालत आहे हा मोठा प्रश्न आहे. कायदा सर्वाना सामान आहे. परंतु मराठी भाषिकांना एक न्याय आणि कन्नड भाषिकांना एक न्याय. अशी वागणूक जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन कशासाठी देत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य मराठी भाषिक जनता विचारात आहे.
राहिला प्रश्न, पुतळा आणि चौकाचे नामकरण करण्याचा तर तेथील स्थानिकांनी, ग्रामस्थांनी, दोन्ही समाजातील नेत्यांनी आणि मान्यवरांनी यावर तोडगा काढला आहे. पुन्हा पुन्हा हे वाद उकरून काढून समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करू पाहणाऱ्या नारायनगौडासारख्या महाभागांना प्रशासनाआधी जनताच धडा शिकवेल. त्यामुळे यापुढे अशा धेंडांनी बेळगावमध्ये येऊन दादागिरीची भाषा करू नये, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, याचे भान जरूर ठेवावे.